आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैफलीत आज रोमांचकारी स्वराभिषेक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - तालआणि स्वरांच्या मोहनिीने रसिकांना आपलेसे केले होते. शास्त्रीय गायकीच्या तरल स्वरांचे भाव ठायी-ठायी उमटले होते, तर तंतूस्वरांतून उमटणारा ध्वनी भारावून टाकत होता. निमित्त होते, व्हायोलनि म्युझिक अकॅडमीतर्फे आणि ‘दिव्य मराठी’ माध्यम प्रायोजक असलेल्या दादासाहेब गायकवाड सभागृहात आयोजित ‘स्वरझंकार’ या मैफलीचे.

भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे पट्टशिष्य, किराणा घराण्याचे पंडित उपेंद्र भट्ट यांच्या स्वरवंदनेने स्वरझंकार मैफलीला प्रारंभ झाला. पायलिया झनक दो मोरे... झनन झनन बाजे झनकारी... हे राग पुरिया धनश्रीतून उमटवताना पंडितजींचा स्वच्छ, टिपेचा धारदार आवाज रसिकांच्या मनाला स्पर्शून गेला. त्यातील आलापी आणि टिपेला गेेलेल्या ताना वाह क्या बात है... आऽऽहा यासह टाळ्यांची दाद घेऊन गेल्या. खमाज रागातील ठुमरी नाही बने गिरीधर... यातील लटका, तक्रार, समजावण्या या सगळ्या जागा पंडितजींनी रसिकांना अक्षरश: दाखवूनच गायल्या. ‘माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी..’ यासह ‘सौभाग्यदा लक्ष्मी भारम्मा’ या कन्नडी ईश्वराच्या नामाचा जयघोष करत त्यांनी स्वरपूजाही बांधली. त्यांना साथसंगत केली ती तबल्यावर नितीन वारे, संवादनिीवर सुभाष दसककर आणि सतारीवर आशिष रानडे आणि आरोह आेक यांनी.

मैफलीच्या उत्तरार्धात साक्षात स्वर्गीय स्वर भूतलावर आल्याचा अनुभव रसिकांनी घेतला. टाळ्यांशिवायही स्वरांना दाद देता येते, अशी स्वरबहार होत असताना रसिक खिळून राहिले होते. पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा यांनी संतूरस्वरांचा नजराणा रसिकांना बहाल केला तेव्हा आपण स्वरमंदिरात एका ईश्वरकृपा असलेल्या वाद्याच्या पूजेत सहभागी झाल्याची अनुभूती होत होती. गावती राग त्यांनी संतूरवर आळवताना त्याला साथ होती ती तबल्याची. संतूर आणि तबल्याची जणू जुगलबंदीच काही क्षणी अनुभवायला मिळाली, तर काही क्षण असे होते की, तबला आणि संतूर एकरूप झाले होते. पंडितजींना तबल्यावर पंडित योगेश सामसी यांनी साथ केली.

स्वरझंकार संगीत महोत्सवाच्या प्रारंभी महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, पार्कसाइड कन्स्ट्रक्शनचे मनोज टिबरेवाल, लिसनर्स ग्रुपचे अॅड. नितीन ठाकरे, ‘दिव्य मराठी’चे डेप्युटी एडिटर अभिजित कुलकर्णी, जेम्स स्कूलच्या मुख्याध्यापिका हिमगौरी आहेर, लोकमान्य मल्टिपर्पज बँकेचे प्रसाद सराफ, सुशांत पाटील, बँक ऑफ महाराष्ट्रचे राजेंद्र दिरांगणे आणि व्हायोलनि म्युझिक अकॅडमीचे अतुलकुमार उपाध्ये यांच्या हस्ते संगीत मैफलीला दीपप्रज्वलनाने प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाला महापािलका आयुक्त प्रवीणकुमार गेडाम, आमदार देवयानी फरांदे, जयंत जाधव यांच्यासह दर्दी नाशिककरांची उपस्थिती होती.

अवर्णनीय स्वरांवर स्वार झालेले पंडित उपेंद्र भट्ट, भीमसेनी गायकीची झालेली पखरण, रागांच्या आळवणीत स्वाधीन झालेले रसिक पूर्वार्धात गायकीत रंगले होते, तर उत्तरार्धात पंडित शिवकुमार शर्मा यांनी रसिकांना संतूर स्वरांचा स्वर्गानुभव देत रोमांचकारी क्षणांचा आनंद दिला.