आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘नेम’ची तत्काळ मदत, पाच वर्षांत तीन हजार जखमींना जीवदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- महामार्ग गुळगुळीत होताहेत तशी अपघातांची संख्याही कमालीची वाढली आहे. अपघातातील जखमींना वाचविण्याची इच्छा अनेक वाटसरूंची असते; परंतु पोलिसी ससेमिर्‍याच्या भीतीने माणुसकी बाजूला ठेवून घटनास्थळावरून काढता पाय घेण्याकडेच लोकांचा कल असतो. अशा बिकट स्थितीत एका कॉलवरून अपघात झाल्याचे समजताच तत्काळ ‘नेम फाउंडेशन’ची जखमींना मदत मिळत आहे. पाच वर्षांपासून यातून मोठा आधार अपघातग्रस्तांना मिळत असून, नेमची रुग्णवाहिका आजवर 3007 इतक्या अपघातग्रस्तांना ‘लाइफलाइन’ ठरली आहे.

पाच वर्षांपूर्वी नाशिक ते कसारा मार्गावर दररोज अपघात होत असून त्यात निष्पाप वाहनधारक, प्रवाशांचा बळी जात होते. या जखमींना रुग्णालयात नेण्याची तत्परता दाखवूनही तातडीने उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडत होत्या. यावर शहरातील काही सामाजिक कार्यकर्ते आणि डॉक्टरांनी एकत्रित येऊन जखमींना घटनास्थळीच उपचार मिळवून देण्यासाठी सुसज्ज रुग्णवाहिका सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, 3 ऑगस्ट 2008 रोजी नाशिक अँक्सिडेंट अँण्ड मेडिकल इर्मजन्सी (नेम) फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, मनपा आयुक्त यांच्या मदतीने आणि महिंद्रा कंपनी, आयएसपी नाशिकरोड, प्रकाश पेट्रोलपंप आणि नाशिक रनच्या माध्यमातून निधी उभारून ही सेवा सुरू करण्यात आली. ‘108’ हा तत्काळ क्रमांक मिळविण्यात आला.

रुग्णांना मोफत सेवा : ‘नेम’ तर्फे केवळ महामार्गावरील नव्हे तर शहराच्या मध्यवर्ती भागात अथवा कानाकोपर्‍यात जखमी पडल्याचे बघून 108 वर संपर्क साधल्यास काही मिनिटांत रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचते. यासाठी महामार्गावर मुंबई नाका, आडगाव नाका, गरवारे पॉइंट, मुख्य अग्निशमन केंद्र अशा चार ठिकाणी चोवीस तास डॉक्टर, नर्सेससह अत्याधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध असते.

जखमींवर उपचाराला प्राधान्य
अपघातातील जखमीस जागेवर उपचार करून त्याच्या नातलगांचा शोध घेऊन त्यांना कल्पना दिली जाते. जखमी व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे जिल्हा अथवा खासगी रुग्णालयात दाखल केले जाते. बेशुद्ध स्थितीत नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करून तातडीने उपचार होण्यास प्राधान्य दिले जाते.
-डॉ. प्रशांत पाटील, संस्थापक सदस्य, नेम फाउंडेशन