आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या बिंदूचा सिंधू होवो..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महागाई, आर्थिक मंदी, वित्तीय तूट, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरती पत. अशा सगळ्या नैराश्याच्या वातावरणात नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव तालुकावासीयांनी एक दिवस खासगी वाहनांचा वापर टाळण्याचा राबविलेला उपक्रम नुसता प्रशंसनीयच नाही, तर अनुकरणीयसुद्धा आहे. परदेशातून होणार्‍या इंधन आयातीवरच आपले परकीय चलन सर्वाधिक प्रमाणात खर्ची पडते व परिणामी महागाई वाढते. तसेच, आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाची पत घसरण्यामागेसुद्धा प्रामुख्याने हेच कारण आहे. किंबहुना, पंतप्रधानांनादेखील त्यामुळेच इंधन बचतीचे जाहीर आवाहन करावेसे वाटले. अशा स्थितीत सतत पाणीटंचाई, दुष्काळाने ग्रासलेल्या आणि दुर्लक्षित, उपेक्षित गटात गणना होणार्‍या नांदगावसारख्या एका तालुक्याच्या ठिकाणी खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहने वापरण्याच्या उपक्रमाचे जे सामाजिक भान बाळगले गेले, ते खूपच महत्त्वाचे म्हणावे लागेल.

व्यवहार आणि पैशाच्याच भाषेत बोलायचे झाले तर या अभिनव प्रयोगाद्वारे एका दिवसात नांदगावकरांनी 1353 डॉलर वाचविले. देशाचा एकूण व्याप पाहता ही रक्कम तशी अल्प, स्वल्पच. पण, त्यापेक्षा कितीतरी महत्त्वाचे आहे ते या प्रयोगात सहभागी झालेल्या सगळ्यांचे योगदान. विशेष म्हणजे, या कामी पुढाकार घेतला तो तेथील तहसीलदार सुदाम महाजन यांनी. एरवी खरे तर सरकारी यंत्रणा आणि त्यातही महसूल खाते म्हटले की तेथील अनागोंदी आणि दप्तरदिरंगाईबाबत बोलायलाच नको, अशी एकूणात जनभावना असते. पण, महाजन यांच्या या विधायक उपक्रमाने त्यालासुद्धा थेट छेद दिला आहे. दर सोमवारी खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहनांचा वापर करण्याची त्यांची ही कल्पना उचलून धरणारे सगळे नांदगाववासीसुद्धा नक्कीच प्रशंसेस पात्र आहेत. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत समाजभान बाळगणारे एक खरे ‘ग्लोबल व्हिलेज’ म्हणून आता नांदगावकडे पाहायला हवे. त्याच हेतूने ‘दिव्य मराठी’ने या उपक्रमास साद्यंत प्रसिद्धी दिली.

अशा विधायक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘दिव्य मराठी’ यापुढेही तत्पर राहील. त्यामुळे ही प्रेरणा घेऊन भविष्यात जिथे जिथे अशा स्वरूपाचे उपक्रम होतील, त्यासाठी ‘दिव्य मराठी’चे व्यासपीठ सदोदित खुले असेल. तेव्हा आता या उपक्रमाचे रूपांतर चळवळीत व्हायला हवे. आज हा प्रयोग बिंदू स्वरूपात असला तरी त्याला इतरांची साथ मिळाल्यास या बिंदूचा सिंधू होण्यास वेळ लागणार नाही.

जयप्रकाश पवार, निवासी संपादक