आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदगावकरांनी एका दिवसात वाचवले देशाचे 1353 डॉलर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदगाव - एका अभिनव प्रयोगाद्वारे दिवसभरात 581 लिटर पेट्रोल आणि 752 लिटर डिझेल वाचवत नांदगावकरांनी 89 हजार 299 रुपये अर्थात 1353 डॉलरची सोमवारी बचत केली. परदेशातून होणार्‍या इंधन आयातीवरच आपले परकीय चलन मोठय़ा प्रमाणावर खर्ची पडते, हे लक्षात घेता एक दिवस खासगी वाहने न वापरण्याचा सकारात्मक उपक्रम नांदगावकरांनी राबविला.

डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य वेगाने घसरल्याने भारतीय अर्थव्यवस्थेवर संकटाचे ढग दाटून आले आहेत. त्यामुळे सोने खरेदी न करण्याचा आणि इंधन बचतीचा सल्ला पंतप्रधानांनी दिला. यात खारीचा वाटा उचलत इंधन बचत करण्याच्या हेतूने नांदगावमधील नागरिकांनी दर सोमवारी खासगी वाहने न वापरण्याचा निर्णय घेतला अन् त्याचा र्शीगणेशा सोमवारी (दि. 2) झाला. शहरातील सर्व शासकीय कार्यालयांतील कर्मचार्‍यांनी तसेच काही नागरिकांनी खासगी वाहनांचा वापर न करता सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांतून प्रवास करत कार्यालय गाठले. त्यामुळे नांदगावमध्ये गेल्या सोमवारच्या तुलनेत सुमारे 581 लिटर पेट्रोल, तर 752 लिटर डिझेल वाचले. परिणामी, 46 हजार 172 रुपये पेट्रोलमधून, तर 43,127 रुपये डिझेलमधून अशा एकूण 89 हजार 299 रुपयांच्या इंधनाची बचत नांदगावकरांनी केली. नांदगावकरांनी जपलेले सामाजिक भान इतरांनीही जपल्यास ढासळत्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागू शकतो, अशी प्रतिक्रिया सर्वत्र उमटत होती.

सोमवारी सकाळी शहरातील प्रमुख मार्गांवरून जनजागृती रॅली काढण्यात आली. तहसीलदार सुदाम महाजन, पंचायत समिती सभापती डॉ. वाय. पी. जाधव, गटविकास अधिकारी तुकाराम सोनवणे, गटशिक्षणाधिकारी एस. डी. भालेराव, पोलिस निरीक्षक सुनील कुराडे, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक प्रशांत जुन्नरे, डॉ. रोहन बोरसे, माजी नगराध्यक्ष अरुण पाटील, राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष विष्णू निकम, कॉँग्रेस शहराध्यक्ष बाळासाहेब कवडे, शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी आदींनी वाहनधारकांना इंधन बचतीचे महत्त्व पटवून दिले.

इंधन बचतीचे देणार धडे
रेल्वे गेट बंद असताना मोठय़ा प्रमाणात वाहनधारक वाहने चालू ठेवतात. या परिसरात दोन पोलिस कर्मचार्‍यांची कायमस्वरूपी नियुक्ती करून त्यांच्याद्वारे वाहनधारकांना गेट बंद असेपर्यंत वाहन बंद ठेवण्याचे आवाहन करून इंधन बचतीचे महत्त्व पटवून देणार आहोत. - सुनील कुराडे, पोलिस निरीक्षक

यांनी टाळली खासगी वाहने
तहसील कार्यालय, पोलिस ठाणे, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामीण रुग्णालय व राज्य परिवहन कार्यालयातील कर्मचारी. पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या सुमारे पंधराशे कर्मचार्‍यांचा सहभाग यात लक्षवेधी ठरला.

पायी अथवा सायकलने प्रवास
दहा किलोमीटरच्या आतील प्रवास मी पायी किंवा सायकलने करणार आहे.- अँड. गुलाबराव पालवे, तालुकाध्यक्ष, माजी सैनिक संघटना

वाहनाचा वापर टाळणार
शहरांतर्गत असणार्‍या कार्यालयीन कामकाजासाठी वाहनाचा वापर टाळणार. - एस. डी. भालेराव, गटशिक्षणाधिकारी

यांनी टाळली खासगी वाहने
तहसील कार्यालय, पोलिस ठाणे, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामीण रुग्णालय व राज्य परिवहन कार्यालयातील कर्मचारी. पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या सुमारे पंधराशे कर्मचार्‍यांचा सहभाग यात लक्षवेधी ठरला.

पुढाकार
रिक्षाचालक : येवला-औरंगाबाद रस्त्यावरील रिक्षाचालक एकाच ठिकाणची भाडे असल्यास प्रवाशांना रिक्षा शेअर करण्याचे आवाहन करणार.
आगार व्यवस्थापक : यात्रोत्सव काळात नागरिकांनी मागणी केल्यास बसची व्यवस्था त्यांना करून देणार असल्याचे सहायक आगार व्यवस्थापक उत्तम पाटील यांनी सांगितले.

एवढी शासकीय वाहने सोमवारी राहिली बंद
नगरपालिका : अग्निशमन वाहन : एक, व्हॅक्युम वाहन : एक, पाणी टॅँकर : एक, ट्रॅक्टर : एक, अँपेरिक्षा : पाच.
पोलिस ठाणे : जीप : एक, दुचाकी : चार.
पंचायत समिती : जीप : एक, एक हातपंप दुरुस्ती वाहन.
ग्रामीण रुग्णालय : दोन रुग्णवाहिकांपैकी एक बंद.
तहसील कार्यालय : एक जीप.

इतके वाचले इंधन (कंसात वाचलेले पैसे)
पेट्रोल : 581 लिटर (46,172.07 रुपये)
डिझेल : 752 लिटर (43,127.2 रुपये)