नंदुरबार - जिल्ह्यातील नागपूर-सुरत महामार्गावरील नदीच्या पुलावर गुजरात येथून एच.सी.एल केमिकल घेऊन जाणाऱ्या टँकर आणि ट्रकचा अपघात झाला. यानंतर परिसरात सर्वत्र घातक केमिकलची गळती सुरू झाली. रसायनाच्या गळतीने परिसरात तब्बल 5 किमी पर्यंत धुराचे लोंढे आणि तीव्र दुर्गंध पसरला आहे. या महामार्गाच्या जवळपास लोकांच्या डोळ्यांना आणि नाकात जळ-जळ होत आहे. एवढेच नव्हे, तर हे रसायन नदीच्या पाण्यात सुद्धा मिश्रीत झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या टँकरमध्ये तब्बल 20 हजार लीटर Hcl रसायन होते. तरीही, यामुळे नागरिकांच्या जीविताला काहीच धोका नसल्याचा दावा ड्रायव्हर करत आहे.
- अपघात सकाळी 8:42 वाजण्याचा सुमारास झाला. तरीही प्रशासनाने घटनास्थळी पोहोचण्यासाठी 45 मिनिटे लावली. त्यात वाढता धूर आणि उग्र वासाने नागरिकांमध्ये घबराट पसरली.
- विषारी रसायनामुळे जवळपासच्या लोकांना नाक आणि डोळ्यात आग सुरू झाली. काहींना तर श्वास घेण्यात सुद्धा त्रास सुरू झाला. उशीरा दाखल झालेल्या प्रशासनाने धावपळ करत केमिकल गळतीवर उपाय-योजना सुरू केली.
- तब्बल तासाभरानंतर प्रशासनाने गळती रोखण्यात यश आल्याचे सांगितले. यासाठी दोन तास महामार्ग बंद करण्यात आला होता. सध्या महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे. तसेच टँकरमधील गळती पूर्णपणे थांबली आहे.
- तरीही पिंपळनेर चौफुलीवर टँकर व अपघात झालेला ट्रक उभा असून रंगावली नदीत केमिकल मिश्रित झाल्याने पाणी दुषीत झाले आहे.
नेमके काय आहे, आणि किती घातक आहे Hcl?
- Hcl हे हायड्रोजन क्लोराईडचे रासायनिक नाव आहे. याला विशिष्ट असा रंग नसतो. ने आण करताना ही गॅस कम्प्रेस करून न्यावी लागते. याचा वास अतिशय उग्र असतो. पोलाद, खाणकाम, आणि तेल उत्खननासह अनेक औद्योगिक प्रकल्पांमध्ये स्वच्छतेसाठी देखील याचा वापर केला जातो.
- वातावरणात या केमिकलची गळती झाल्यास सर्वप्रथम डोळे आणि नाकात त्रास होतो. काहींना यामुळे श्वसनाचा त्रास देखील उद्भवू शकतो. त्वचेला हे रसायन लागल्यास खाज किंवा त्वचेचे रोग होऊ शकतात.
- त्वचेला रसायनाचा स्पर्श झाल्यास फोड आणि जखमा सुद्धा होण्याचा धोका आहे. थेट डोळ्यांत एचसीएल गेल्यास तात्पुरते किंवा कायमचे अंधत्व सुद्धा होऊ शकते.
- अमेरिकेच्या विषारी वायू नियंत्रण केंद्र आणि सर्वेक्षण यंत्रणेच्या आकडेवारीनुसार, तेथे 22 जणांना या वायूचा गंभीर प्रादुर्भाव झाला. त्यापैकी काहींचा कायमचे अंधत्व, अपंगत्व आले आहे. तर वॅटसन येथे 2 जणांच्या मृत्यूची देखील नोंद आहे.