आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कविवर्य नारायण सुर्वे यांची मृत्यूनंतरही अवहेलनाच!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - जेव्हा तारे आप्त म्हणून माझ्या घरी येतील
दारी उभा असेन नसेन कुणास ठाऊक
ऋतूंनो, वार्‍यांनो, फुलांनो, नाजूक पर्‍यांनो
जेव्हा या देशात याल कदाचित मी नसेन

अशी व्यथा आपल्या कवितेतून अभिव्यक्त करणार्‍या कविवर्य नारायण सुर्वे यांच्या मृत्यूनंतरही राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाकडून त्यांची अवहेलना थांबलेली नाही. त्यांच्या नावाने उभ्या राहणार्‍या सांस्कृतिक भवनासाठी देऊ केलेल्या 1286 चौ.मी.पैकी 409 चौ.मी. जागेविषयी ना शासनाला कल्पना आहे ना प्रशासनाला!

समाजाच्या दु:खांना निवारण्याचे क्रांतिकारी मार्ग आपल्या विविध कवितेतून सांगणारे कविवर्य नारायण सुर्वे यांची नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्राशी घट्ट नाळ जुळली ती इथल्या कष्टकरी व कामगार वर्गामुळे. या नात्यातूनच 1998 मध्ये सिडकोतील छत्रपती संभाजी स्टेडियमजवळील मानव सेवा केंद्रात त्यांच्या नावे वाचनालय उभे राहिले. त्यासाठी स्वत:कडील ग्रंथसंपदा या वाचनालयास अर्पण केली. समाजव्यवस्थेत दुर्लक्षित कामगाराला लढण्यासाठीचे बळ त्यांनी कवितेद्वारे दिले. त्यामुळेच नाशिकसारख्या बहुसंख्येने कामगार असणार्‍या शहरात त्यांच्या नावाने एक सांस्कृतिक भवन उभे राहावे, या कल्पनेने जन्म घेतला आणि वाचनालयाच्या विश्वस्तांनी त्या दिशेने प्रवास सुरू केला. अर्थात, ही संकल्पना सुर्वे यांनाही भावली. त्यांना लाभलेले पद्र्मशी, संत कबीर, जनस्थान यासह विविध 400 पुरस्कार आणि इतर अनमोल ग्रंथसंपदेची जपणूक या सांस्कृतिक भवनात जपली जावी, असा उदात्त विचार या सांस्कृतिक भवनामागे होता. त्यास सुर्वे यांनीही होकार देत ही बहुमूल्य ग्रंथसंपदा सुपूर्द केली. सांस्कृतिक भवनासाठी जागा मिळावी, यासाठी वाचनालयाच्या विश्वस्तांनी शासनाकडे पत्रव्यवहार केला. सन 2006 मध्ये जागा देण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र, प्रत्यक्षात त्यासाठी सन 2009 पर्यंत प्रतीक्षा करावी लागली. कामठवाडे येथील स. नं. 22/1क/2 पैकी 1286.86 चौ.मी. क्षेत्र मंजूर करीत तसा आदेशही शासनाने काढला. बाजारमूल्याच्या 25 टक्के म्हणून वाचनालयाने चार लाख 38 हजार 500 रुपये शासनाकडे भरले. मात्र, मंजूर केलेल्या या क्षेत्रापैकी 409.89 चौ.मी. जागाच अद्याप ताब्यात न मिळाल्याने सांस्कृतिक भवनाचे काम रखडले आहे.

नाशिकमध्ये स्थायिक होऊ पाहणार्‍या सुर्वे यांची महापालिकेने यापूर्वी अशीच अवहेलना केली होती. त्यांच्यासाठी निवासस्थान देण्याची घोषणा थाटात केली. मात्र, ही घोषणा हवेतच विरली. आताही प्रशासनाकडून सांस्कृतिक भवनाविषयी चालढकलच सुरू आहे.