आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi 10 Youth One Booth Formula In Maharashtra

नरेंद्र मोदींचा बूथविस्तारक फॉर्म्युला आता महाराष्ट्रातही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - गुजरातमध्ये सलग तिसर्‍यांदा सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या यशाचे गमक असलेल्या ‘बूथविस्तारक अभियानाला’ आता महाराष्ट्रातही चालना देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला प्रभारी नियुक्त करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकांसाठी पक्षाच्या राष्ट्रीय प्रचारप्रमुखपदी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची निवड होताच त्यांनी गुजरात फॉर्म्युला राबविण्यास सुरुवात केली, याच धर्तीवर नाशकात आठवडाभरात चार बैठका घेण्यात आल्या आहेत. मुळात नाशिक लोकसभेची जागा शिवसेनेकडे असताना मित्रपक्ष भाजपने तयारी चालविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुका लक्षात घेता भारतीय जनता पार्टीकडून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी विविध अभियान राबविले जात आहेत. गेल्या वर्षभरापासून पक्षातील गटबाजीमुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली मरगळ झटकण्यासाठी आता पक्षर्शेष्ठींनाच दखल घेऊन नियमित मंडल, केंद्राच्या बैठकांना प्रारंभ झाला आहे. त्यातच नाशिक लोकसभेची जागा शिवसेनेला पूर्वापार सोडली असली तरीही पक्षाकडून गुजरातमध्ये यशस्वी झालेल्या बूथविस्तारक अभियान माध्यमातून कार्यकर्त्यांपर्यंत संपर्क वाढविण्यात येत आहे.

काय आहे बूथविस्तारक अभियान?
बूथअंतर्गत येणार्‍या प्रत्येकी 25 ते 30 कुटुंबीयांपर्यंत बुथप्रमुखाकडून नियमित संपर्क ठेवला जातो. दहा बूथप्रमुखांचा एक बूथविस्तारक नियुक्त केला जातो. बूथविस्तारकाने स्वत:चे काम पूर्ण केल्यास त्याची दुसर्‍या विभागासाठी निवड करून त्याने त्याठिकाणी जाऊन बूथप्रमुखाची रचना तपासून पक्षर्शेष्ठींना अहवाल द्यावा. बूथप्रमुखाकडून मतदारांची नोंदणी, नवीन सभासद, जनजागृती केली जाते. गुजरातच्याच धर्तीवर नाशिक शहरातही बूथऐवजी मंडलनिहाय कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सिडको प्रमुखाकडे पंचवटीच्या प्रमुखांकडे नाशिकरोड, सातपूरचे द्वारका याप्रमाणे रचना करण्यात आली.

मंडलनिहाय बैठकांचे सत्र
पक्षर्शेष्ठींच्या आदेशानुसार शहर पदाधिकार्‍यांमध्ये अचानक उत्साह संचारल्याचे दिसत असून, आंदोलनांपाठोपाठ बैठकांवर लक्ष्य केंद्रित करण्यात आले आहे. आठवडाभरात पक्ष संघटना बांधणीसाठी बूथविस्तारक अभियानांतर्गत पंचवटी, द्वारका आणि मध्य नाशिकच्या बैठका घेण्यात आल्या आहेत, तर उर्वरित बैठकाही आठवडाभरात उरकण्याची शक्यता आहे. शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, सरचिटणीस सुनील केदार, माजी महापौर बाळासाहेब सानप, युवा मोर्चा अध्यक्ष गिरीश पालवे, कैलास आहिरे यांच्या उपस्थितीत बैठका पार पडत आहेत.