आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बापट कला विभाग नाशिककरांसाठी खुला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- माजी आएएस अधिकारी नरहरी बापट आणि साहित्यिका सौ. ललिताताई बापट यांच्या संग्रहातील 161 मूर्तींच्या दानातून साकारलेल्या बापट कला विभागाचे उद्घाटन सार्वजनिक वाचनालयाच्या वस्तुसंग्रहालयात करण्यात आले. सौ. बापट यांचे बंधु डॉ. सुधाकर साने यांच्या हस्ते या दालनाचा शुभारंभ करण्यात आला. या निमित्ताने नाशिककरांसाठी दुर्मिळ मूर्तींचा संग्रह असलेले मोठे दालन खुले झाले.

सावाना वस्तुसंग्रहालयात झालेल्या बापट कलादालनाच्या शुभारंभानंतर प. सा. नाट्यगृहात हा शुभारंभाचा सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर बापट दांपत्यासह डॉ. सुधाकर साने, सौ. साने, कार्यक्रमाच्या अध्यक्षा शिल्पकार अरुणाताई गर्गे, सावानाचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर, जेठाराम बटाविया, अण्णासाहेब बेळे, पद्मजा देवल, लक्ष्मण सावजी आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याप्रसंगी बोलताना डॉ. साने यांनी देणगी देणारी माझी मोठी बहीण असून तिने या मूर्ती दान दिल्याबद्दल मला आनंदच वाटत असल्याचे सांगितले.

दान देण्याचा वारसा आम्हाला आमच्या आई-वडिलांसह मागील पिढय़ांकडून मिळालेला असल्याने तोच वारसा तिने पुढे चालविला आहे, असे मला वाटते. आमच्या कुटुंबीयांना मिळालेले ज्ञान, मान, संपत्ती या सगळ्यांचे दान करण्याचीच परंपरा आमच्याकडे असून त्याचाही अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले. जाणारी प्रत्येक व्यक्ती रिकाम्या हाताने जात असते. त्यामुळेच आपल्यामागे लोकांनी आपल्याबद्दल गौरवोद्गार काढावेत, अशाच भावनेने प्रत्येकाने कार्य करावे, हीच इच्छा असल्याचेही डॉ. साने यांनी नमूद केले.

याप्रसंगी बोलताना भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी बापट दांपत्याशी युतीच्या काळात सेन्सॉर बोर्डवर काम करताना आलेला संबंध आणि ऋणानुबंध जुळल्याची आठवणही उपस्थितांसमोर सांगितली. त्यांच्याकडे या मूर्तींचे दान मागणार्‍या अनेक संस्था होत्या. मात्र सावाना वस्तुसंग्रहालयात या मूर्तींना तितक्याच प्रेमाने आणि मनोभावे जपले जाईल, असा मी त्यांना विश्वास दिल्यानंतर त्यांनी त्या सावानाला दान देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचा ऋणी असल्याचे सांगितले.

सावाना वस्तुसंग्रहालयात अनेक कलावस्तू दान केलेल्या जेठाभाई बटाविया यांनी त्यांच्या मनोगतात नाशिकसह अन्य राज्यांमधूनदेखील या पुराण वस्तूंचा संग्रह केल्याचे नमूद केले. यावेळी बापट दांपत्य आणि जेठाभाई बटाविया यांचा सावानातर्फे सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिजीत बगदे यांनी, तर पाहुण्यांचा परिचय विनया केळकर यांनी करुन दिला. सूत्रसंचलन सुरेश गायधनी यांनी केले.