आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नासामध्ये जाण्याच्या स्वप्नांना जिद्दीचे पंख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- बारावीनंतर आपल्या करिअरचे अवकाश नाशिकपुरतेच र्मयादित न ठेवता गुणवत्ता व मेहनतीच्या जोरावर अमेरिका गाठत सुश्मिता वाळवे या नाशिकच्या विद्यार्थिनीने तरुणांसमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे. बारावीपर्यंत विज्ञान शाखेत शिक्षण घेऊन अमेरिकेत ती वर्षभरापासून अँस्ट्रोफिजिक्स या विषयामध्ये पदवीचे शिक्षण घेते आहे. सुटीनिमित्त नाशिकमध्ये आली असता तिने ‘दिव्य मराठी’स आपला अनुभव सांगितला.

अमेरिकेत पदवीसाठीचे शिक्षण घेण्यासाठी सुश्मिताने सॅट परीक्षा देऊन सिनसिनाटी या अमेरिकेतील विद्यापीठात प्रवेश घेतला. सॅट या परीक्षेबरोबर इयत्ता आठवी ते अकरावीचे गुण विचारात घेतले जातात. त्यामुळे बारावीचा निकाल लागण्याआधीच पाइपलाइनरोड परिसरात राहणार्‍या सुश्मिताला अमेरिकेत प्रवेश मिळाला. दहावीत 88 टक्के मिळवत तिने शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आणि अँस्ट्रोफिजिक्समध्येच करिअर करण्याचा निर्णय घेतला. ती शिकत असलेल्या सिनसिनाटी विद्यापीठात काही वर्षांपूर्वी अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉँग शिकवायचे. त्यामुळे सुश्मिताला नासामध्ये काम करणे अधिकच बळ देणारे ठरले व प्रेरणा मिळाली. तिचे वडील ज्योतिषी व अभियंता असल्याने लहानपणापासूनच तिच्यावर ज्योतिषाचे संस्कार झाले व आता ती आपल्या करिअरचे अवकाश थेट अमेरिकेत अजमावते आहे.

सुश्मिताला पदव्युत्तर पदवी व पीएच.डीही करायची इच्छा असून त्यासाठी ती कसून अभ्यास करते आहे. यासाठी तिला तिचे कुटुंब नेहमीच पाठिंबा देत आले आहे. सध्या ती शिष्यवृत्तीच्या बळावर अमेरिकेत शिकते आहे.

गुणवत्ता व जिद्द महत्त्वाची
अमेरिकेत शिक्षणाच्या अनेक संधी व त्यादृष्टीने विविध सुविधाही उपलब्ध आहेत. शिष्यवृत्तीमुळे आर्थिक दडपण येत नाही. त्यामुळे करिअर परदेशात करू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना अमेरिकेसारख्या ठिकाणी गुणवत्ता व जिद्द असल्यास हमखास यश मिळवता येऊ शकते.
-सुश्मिता वाळवे