आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाबमधील 16 वर्षांपासून फरार संशयित जेरबंद, अल्‍पवयीन मुलीवर बलात्‍कार केल्‍याचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक/ देवळाली कॅम्प - सोळा वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि दहा वर्षीय मुलाचे अपहरण करून फरार झालेल्या पंजाब येथील गुन्हेगारास अटक करण्यात गुन्हे शाखा युनिटच्या पथकाला यश आले. शनिवारी (दि. ४) रात्री १०.३० वाजता लहवित येथील गुरुद्वारा परिसरात पथकाने ही कारवाई केली. संशयित गुरुद्वारात ग्रंथी म्हणून काम करत होता.
 
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंजाबमधील तांडा पोलिस ठाणे (जि. होशियारपूर) येथे १६ वर्षांपूर्वी संशयित सुखदेव चनान सिंग (४५) याच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि एक दहा वर्षांच्या मुलाच्या अपहरणप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात अालेला अाहे. या दोन्ही गुन्ह्यांत संशयित तब्बल १६ वर्षांपासून फरार होता. पंजाब पोलिसांचे एक पथक महाराष्ट्रात त्याचा शोध घेत होते. नाशिक पोलिसांनाही याबाबत कळवण्यात अाले हाेते. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी गुन्हे शाखा युनिट ला या संशयिताचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. पथकाचे सहायक निरीक्षक गंगाधर देवाडे यांनी सोळा वर्षांपूर्वीच्या फोटोच्या अाधारे शहरातील गुरुद्वारांमध्ये तपास केला असता लहवित येथील गुरुद्वारामध्ये अशा वर्णनाशी साधर्म्य असलेला व्यक्ती असल्याचे निदर्शनास आले. मात्र, गुरुद्वारामधून संशयितास अटक केल्यास धार्मिक भावना दुखावण्याची शक्यता असल्याने पथकाने सकाळी ११ ते रात्री १०.३० वाजेपर्यंत गुरुद्वारा परिसरात सापळा रचला. संशयित बाहेर येताच त्यास अटक करून त्यास पंजाब पोलिसांच्या ताब्यात दिले. उपआयुक्त विजय मगर, सहायक निरीक्षक अशोक नखाते, वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर, देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याचे सुभाष डवले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. लहवितचे पोलिसपाटील संजय गायकवाड यांनी तपासात मदत केली.
 
ग्रंथी बनत लपवली ओ‌ळख : संशयित हा ग्रंथी म्हणून राहात होता. पंजाब पोलिस येथे कधी येणार नाहीत, अशी मनात धारणा ठेवत तो राहत होता. नाशिक पोलिसांमुळे तो पकडला गेला. पंजाबच्या पोलिस महासंचालकांनी देवाडे यांचे अभिनंदन केले.
 
लाल रंगाने पटली ओळख
पंजाब पोलिसांकडे संशयिताचा सोळा वर्षांपूर्वीचा एकमेव फोटो होता. त्यात दाढी नव्हती. मात्र, चेहरा लाल असल्याची एकमेव खूण होती. शहरातील सात गुरुद्वारांमध्ये तपास केला असता लहवितला या चेहऱ्याचे साधर्म्य असलेली व्यक्ती ग्रंथी म्हणून काम करत असल्याचे स्पष्ट झाले. गुरुद्वारामधून ही व्यक्ती बाहेर आल्यानंतर त्यास अटक केली.
- गंगाधर देवाडे, सहायक निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट

पंजाब उच्च न्यायालयाची नोटीस, नंतर झाली कारवाई
अपहरण झालेल्या मुलाच्या कुटुंबीयांनी पंजाब उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या खटल्यात न्यायालयाने पंजाबच्या पोलिस महासंचालकांवर ताशेरे ओढले होते. तसेच वॉरंट काढत महाराष्ट्रासह इतर राज्यात तपास करण्याचे आदेश दिले होते. डीजींनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक स्थापन केले होते. त्यानुसार एक पथक नाशिकमध्ये तपास करत होते.
बातम्या आणखी आहेत...