आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दबाव गट निर्माण करून महिलांनी हाती घ्यावीत ‘कृषी’ची सूत्रे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक: कृषीचे सूत्र पुरुषांच्या हाती असल्याने शेती उद्योग हवा तसा भरभराटीला आला नाही. शासकीय कृषी विभागात प्रत्येक महत्त्वाच्या पदावर पुरुष विराजमान आहेत. आतापर्यंत एकही महिला कृषिमंत्री झाली नाही. त्यामुळे महिला शेतकर्‍यांनी दबाव गट निर्माण करून कृषीची सूत्रे आपल्या हातात घ्यावीत, असे आवाहन पहिल्या महिला साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षा व ज्येष्ठ साहित्यिका डॉ. प्रतिमा इंगोले यांनी केले.
सप्टेंबर महिन्यात नाशिकमध्ये आयोजित पहिले महिला कृषी साहित्य संस्कृती संमेलनाच्या पार्श्वभूमीवर पद्मर्शी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्रतिष्ठान व कृषी विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी घोटी येथील जैन मंगल कार्यालयात पूर्व संमेलन घेण्यात आले. आमदार निर्मला गावित, नीलिमा साठे, जिल्हा कृषी अधीक्षक कैलास मोते, कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष अरुण आंधळे, जिल्हा परिषद सदस्य बेबीताई माळी, शिवनाथ बोरसे, डॉ. जे. के. पूरकर आदींची याला प्रमुख उपस्थिती होती.
शेतीचा शोध महिलांनी लावला असून, कालांतराने शेतीवर पुरुषांचा हक्क प्रस्तापित झाल्याचे इंगोले म्हणाल्या. पूर्वी रानटी, शिकारी, पशुपालन अशा अवस्थांमधून मानवाचा प्रवास झाला आहे. ज्यावेळी मानव हा शिकारी अवस्थेत होता त्यावेळी महिला ही झाडाखाली बसून मुलांचा साभांळ करीत होती. त्यादरम्यान शेतीचा शोध लागला. आर्य काळापासून मालकी हक्क पद्धत सुरू झाली. पूर्वी अपत्यांच्या नावापुढे आईचे नाव लावले जात होते. त्यानंतर हक्क पद्धत सुरू झाली तेव्हा शेती, अपत्य यांच्यापुढे पुरुषांचे नाव लावण्याची पद्धत सुरू झाली, अशी माहितीही इंगोले यांनी दिली.
उद्घाटन सत्रानंतर दुपारी चंदाबाई तिवाडी यांचे भारूड, तर दुपारी ‘कृषी, साहित्य व संस्कृतीमधील महिलांचे योगदान’ या विषयावर परिसंवाद झाला. त्यात साधना जाधव, अश्विनी कुलकर्णी, नीलिमा साठे, कल्पना जाधव, विद्या पाटील, कविता अत्राम यांनी सहभाग घेतला होता. साहित्य संमेलनासाठी घोटी तालुक्यातील ग्रामीण भागातील आदिवासी महिला उपस्थित होत्या. तसेच कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.