आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक विमानतळ बुधवारपर्यंत जाणार एचएएलच्या ताब्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सार्वजनिक बांधकाम विभागाने कुठल्याही परिस्थिती येत्या बुधवारपर्यंत विमानतळ एचएएलच्या ताब्यात द्यावे, असे स्पष्ट आदेश राज्याचे अपर मुख्य सचिव पी. एस. मीणा यांनी दिल्याने आता नाशिक विमानतळाच्या हस्तांतरणाचा अधांतरीत प्रश्न मार्गी लागणार आहे.
आगामी सिंहस्थात विमानसेवा नाशिकहून सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु, काम पूर्ण होऊनही विमानतळ मालकीच्या वादामुळे हस्तांतरणास खोडा बसला होता. त्यातच ओल्या पार्टीने हे विमानतळ सुरू होण्यापूर्वी वादात सापडले होते. त्यामुळे हस्तांतरणाचा मुद्दा अधिकच तीव्रतेने हाताळण्यात आला. २८ फेब्रुवारीपर्यंतच त्याचे जबाबदारी एचएएलने स्वीकारावयाची होती. तसे आदेशही मीणा यांनी दिले होते. परंतु, त्यास महिनाभराचा विलंब झाल्यानंतर अखेर पुन्हा त्यांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी एचएएलचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली. त्यामध्ये बुधवारपर्यंत हे विमानतळ एचएएलने ताब्यात घेण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले. मात्र, काही कामे अपूर्ण असून, काही निविदेत नसली तरी करावी लागणार आहे. शिवाय, निविदेत नसलेली मात्र पूर्ण झालेल्या कामांबाबत काय, असा सवाल एचएएलच्या वतीने उपस्थित झाला.
अखेर त्यावर एचएएलच्या अधिका-यांनी विमानतळ टर्मिनस इमारतीसह संपूर्ण कामांची पाहणी करावी, त्यात कुठली कामे करावयाची आहे. निविदेप्रमाणे कुठली होणे अपेक्षित होती, परंतु ती झाली नाही. निविदेव्यतिरिक्त केलेली कामे, कामे पूर्ण परंतु त्यात दुरुस्ती अपेक्षित आहे. अशा विविध प्रकारच्या कामांची यादी करून जिल्हाधिका-यांकडे सुपूर्त करावयाचा निर्णय झाला असून, ही कामे लागलीच ३० दिवसांत पूर्ण करून देण्याची जबाबदारीही जिल्हाधिका-यांनी स्वीकारली आहे. त्यामुळे आता विमानतळाचे हस्तांतरण बुधवारी होणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे. बैठकीस एचएएलचे महाव्यवस्थापक आर. नारायणन, मुख्य कार्यकारी अधिकारी दलजीत सिंग, पी. जी. शेटे, व्ही. जी. देवधर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डी. डी. उकिर्डे, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह उपस्थित होते.