आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Airport News In Marathi, Hindustan Airnautics Limited, Divya Marathi

नाशिकच्या प्रस्तावित विमानसेवेला सरकारचाच रेड सिग्नल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राज्य सरकारच्या आडमुठय़ा धोरणामुळे नाशिकच्या विमानतळावरून सुरू होणारी विमानसेवा रखडण्याची चिन्हे आहेत. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) समवेत राज्य शासनाने केलेल्या सामंजस्य करारात कुठेही उल्लेख नसलेल्या बाबींचा हट्ट यामागे आहे. राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव पी. एस. मीणा यांच्या स्वाक्षरीने एचएएलला नुकतेच एक पत्र पाठविण्यात आले असून, त्यात विमानतळ सुरक्षेचा खर्च एचएएलनेच करावा, असे स्पष्टपणे म्हटले आहे. दरम्यान, करारात याबाबत काहीच जबाबदारी नसताना असे पत्र मिळाल्याने एचएएल हा खर्च करायला तयार नसल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

नाशिक विमानतळाचे बांधकाम राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केले आहे. त्यासाठी जवळपास 83 कोटी रुपये खर्च झाला असून, लॅँडिंग, नाईट लॅँडिंग याकरिता धावपट्टी आणि विमानतळाची अंतर्गत सुरक्षा व्यवस्था यांसारख्या सुविधा एचएएलने पुरवायच्या असल्याचा उल्लेख यासंदर्भात झालेल्या सामंजस्य करारात आहे. विमानतळाचे काम पूर्ण झाल्यानंतर ते एचएएलकडे हस्तांतरित करायचे असून, त्यानंतर निविदा मागवून विमानतळ चालवू शकणार्‍या संस्थेची निवड केली जाणार आहे. मात्र, आता या पत्राने सर्व वातावरणच बदलले असून, कराराचा भंग करीत असे पत्र का पाठविण्यात आले असावे, असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.

जिल्हाधिकार्‍यांना करणार विनंती
एचएएल प्रशासनाने याबाबत जिल्हाधिकार्‍यांनाही पत्र दिल्याची माहिती हाती आली असून, जिल्हाधिकार्‍यांसमवेत शहरातील उद्योजक, व्यावसायिकांची बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्याबाबत आग्रह धरला जाणार असल्याचे उद्योजक संघटनेच्या एका वरिष्ठ पदाधिकार्‍याने सांगितले.

काय आहे सद्यस्थिती
विमानतळाचे काम पूर्ण झालेले आहे. ते कार्यान्वित होण्यासाठी ज्या-ज्या परवानग्या गरजेच्या आहेत, त्याकरिता डीजीसीएसारख्या केंद्रीय संस्थांकडून सर्वेक्षणही करण्यात आले आहे. विमानतळ एचएएलकडे हस्तांतरित होण्याची वाट पाहिली जात आहे. विमानतळ चालविण्यासाठी ‘डीटीके’ आणि ‘जीएमआर’ या दोन संस्थांनी तयारी दर्शविली आहे.