आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Airport News In Marathi, Jet Airways, Airline Service, Divya Marathi

नाशिकला विमानसेवेसाठी कंपन्यांकडून सर्वेक्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण तसेच मुंबईनंतर सर्वोत्कृष्ट मानल्या जाणार्‍या नाशिक विमानतळावरून विविध कंपन्यांच्या विमानसेवा आगामी काही महिन्यांतच मिळण्याची चिन्हे आहेत. मुंबई विमानतळाला पर्यायी विमानतळ म्हणून अहमदाबादऐवजी नाशिक विमानतळाचा वापर करता येणे शक्य आहे का, हे पडताळून पाहण्यासाठी सोमवारी जेट एअरवेजच्या सात सदस्यीय शिष्टमंडळाने विमानतळाला प्रत्यक्ष भेट दिली. त्यानंतर आता किती नाशिककर, किती वेळा, कुठे विमानप्रवास करतात याचे सर्वेक्षणही सुरू असून, लवकरच इतरही कंपन्या पाहणीसाठी येणार आहेत.


जेट एअरवेजच्या समितीने नाशिक विमानतळावरील नाईट लॅँडिंग, सपोर्ट सिस्टिम, रन-वे, सुरक्षा, वातावरण, इंधन क्षमता, टर्मिनलमध्ये उपलब्ध सुविधांची सविस्तर माहिती घेतली. कंपनी सर्वेक्षणानंतर कोणत्या मार्गावर सेवा सुरू करता येईल, याचा अहवाल तयार करणार आहे. त्यासाठी नाशिक इंडस्ट्रिज अँण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनला सहकार्यासाठी साकडे घालण्यात आले असून, विविध संघटनांकडून याची माहितीही मागविण्यात येत आहे.
यानंतर स्पाइस जेट आणि इतरही कंपन्यांकडून नाशिकला भेट देण्यात येणार असल्याचे ‘निमा’च्या पदाधिकार्‍यांनी सांगितले.


उद्योजकांनी मांडली सद्यस्थिती
महिंद्रा अँण्ड महिंद्रा, बॉश, सिमेन्स, एबीबीसारख्या कंपन्यांतून कर्मचार्‍यांना प्रशिक्षणे, व्यावसायिक कारणाने दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद, बडोदा, हैदराबाद या शहरांत जावे लागते. त्यासाठी मुंबईला जाऊन विमानसेवा घ्यावी लागते. शहरातील एका नामांकित ट्रॅव्हलमधून मुंबई एअरपोर्टला किमान 40 गाड्या प्रत्येकी 5 प्रवासी घेऊन जातात. यामुळे किमान 100 जाणारे तर तितकेच येणारे प्रवासी आहेत. याव्यतिरिक्त कुलकॅब आणि व्यक्तिगत वाहनांनी जाणार्‍या प्रवाशांची संख्या मोठी असल्याचे निमाचे सरचिटणीस मंगेश पाटणकर यांनी सांगितले.


आर्थिकदृष्ट्याही परवडणारे
पर्यायी विमानतळ म्हणून मुंबईला अहमदाबादपेक्षा नाशिकचे विमानतळ आर्थिकदृष्ट्याही परवडणारे आहे. कारण, अहमदाबादचे मुंबईपासूनचे अंतर 300 एअरनॉटिकल मैल असून, 5 टन इंधन विमानाला लागते. दुसरीकडे नाशिक विमानतळ मुंबईपासून अवघे 70 एअरनॉटिकल मैल असून, अर्धा टन इंधन लागते. यामुळे नाशिक विमानतळाला कंपन्या पसंती देतील, असा सूर जेटच्या टीम भेटीत दिसून आला. मनीष कोठारी, अध्यक्ष, निमा