आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलग दुसर्‍या दिवशी नाशिक, सातार्‍यात पावसाचा तडाखा; वीज पडून एका मुलाचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सलग दुसर्‍या दिवशी बुधवारी दुपारी नाशिक शहर व जिल्हय़ात वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. काही ठिकाणी झाडे उन्मळल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. सातारा शहर व परिसरातही बुधवारी वादळी वार्‍यासह हलका पाऊस झाला.
नाशिक जिल्हय़ातील सोनांबे आणि कोनांबे (ता. सिन्नर) शिवारात बुधवारी दुपारी झालेल्या वादळी पावसाने अनेक घरांवरील पत्रे, कौले उडाल्याने घरात पावसाचे पाणी शिरले. सोनांबे येथे वीज पडून गौरव सुकदेव बोर्‍हाडे या नऊवर्षीय मुलाचा मृत्यू झाला. तो आई-वडिलांसमवेत खत पांगवण्यासाठी शेतात आला होता. वादळ आणि पाऊस सुरू झाल्याने तो झाडाखाली थांबला. नेमकी याच झाडावर वीज पडल्याने गौरव गंभीर जखमी झाला. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालविली होती.
कोनांबे ग्रामपंचायत इमारतीतील महा ई-सेवा केंद्राचे पत्रे उडाल्याने त्यातील काही महत्त्वाची कागदपत्रे भिजली. संचालक संजय डावरे यांनी तहसीलदारांना यासंदर्भात माहिती दिली. दस्त भिजल्याने नागरिकांना आता नव्याने प्रस्ताव सादर करावे लागतील.
पिकांचे नुकसान, घरे पडली
सातारा । शहर व जिल्हय़ातही बुधवारी सलग दुसर्‍या दिवशी मेघगर्जनेसह पाऊस पडला. मंगळवारी रात्रीही या भागात जोरदार पाऊस झाल्याने शेतीपिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले, तसेच वादळी वार्‍याने पत्रे उडाल्याने अनेकांच्या डोक्यावर छप्पर राहिले नव्हते. जिल्हय़ात मंगळवारी वीज पडून दोघांचा मृत्यू झाला होता. रहिमतपूर, वडगाव, लोणंद, मलकापूर, गोंदवले, मलवडी या भागात मंगळवारी रात्री वादळी वार्‍यामुळे घरांवरील पत्रे उडाले तर काही ठिकाणी घराच्या भिंतीही पडल्या. काशीळ, अतित येथील ग्रीनहाऊसचेही मोठे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी आणि कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत.
मंगळवारी रात्री वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे सातारा शहर परिसरातील शेतीपिके व घरांचे मोठे नुकसान झाले.