आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंबड एमआयडीसीत सहा कोटींचे ट्रक टर्मिनस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- अंबड एमआयडीसीमध्ये ट्रक टर्मिनस उभारण्यात येणार असून त्यासाठी औद्योगिक वसाहतीतील आयमा रिक्रिएशन सेंटरजवळ 22 हजार चौरस फुटांचा भूखंडही आरक्षित करण्यात आला आहे. महापालिकेच्या सहकार्याने हे टर्मिनस उभारले जाणार आहे. त्यासाठी सहा कोटी रुपयांचा प्रस्ताव एमआयडीसीने मुख्यालयास पाठवला असून तो मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. वर्षभरात हे टर्मिनस उभारले जाण्याची शक्यता आहे.

अंबड औद्योगिक वसाहतीत 2200 च्या आसपास उद्योग आहेत. या उद्योगांना लागणारा कच्चा माल घेऊन मुंबई, पुणे, अहमदाबाद, वापी, सिल्वासा येथून अनेक अवजड वाहने येतात. माल कंपनीत उतरवल्यानंतर वाहनचालक लगेचच रिकाम्या गाड्या घेऊन त्यांच्या शहरात परतत नाहीत, तर याच वसाहतीतील उत्पादित माल इतर शहरात भरून नेतात. ट्रान्सपोर्ट कंपनीला येथून इतर शहरात माल नेण्याची ऑर्डर मिळेपर्यंत वाहने वसाहतीतच उभी राहतात. किमान एक-दोन दिवस ही वाहने वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांवर उभी राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आणि काही छोटे-मोठे अपघातही होतात. याला आळा बसण्यासाठी एमआयडीसीने ट्रक टर्मिनस उभे करावे, अशी मागणी उद्योजकांकडून सातत्याने केली जात होती. ती आता पूर्ण होणार आहे.

एकाच वेळी तीनशे वाहने
जवळपास पाच एकरावरील या टर्मिनसवर एकाच वेळी तीनशेच्यावर वाहने उभी राहू शकतील. टर्मिनसच्या सर्व जागेवर अस्तरीकरण केले जाणार आहे. वाहनचालकांसाठी विश्रामगृह, स्नानगृहाची व्यवस्था असेल. तसेच, उपाहारगृहाची सुविधाही तेथे राहील. पेट्रोल पंपाची सुविधा उभारण्याचीही प्रस्तावात तरतूद आहे.

महापालिकेलाही संधी
महापालिकेच्या बंद पडलेल्या आडगाव आणि मुंबई महामार्गावरील जकात नाक्यांवर प्रत्येकी किमान दोनशे वाहने उभी राहू शकतात.तेथे ट्रक टर्मिनस उभे केले तर महापालिकेला उत्पन्नाचा अतिरिक्त स्त्रोत निर्माण होणार आहे. उद्योजकांसह ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडूनही याला उत्तम प्रतिसाद मिळेल, असे या दोन्ही संघटनांच्या पदाधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

हा होईल फायदा
अंबडला कच्च माल घेऊन येणार्‍या कंटेनर, ट्रकना हक्काचा थांबा तर मिळेलच. शिवाय, वसाहतीतील रस्त्यांवर होणारी अवजड वाहनांची अवैध पार्किंगही रोखता येणार आहे.