आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रफुल्ल सावंत यांचा कुंचला परदेशात चमकला..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - भारताच्या इतिहासात आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांच्या नोंदी आहेत. मात्र अमेरिका येथील वॉटर कलर सोसायटीतर्फे मिळणारा पुरस्कार गेल्या १४८ वर्षांत भारतात आलेला नाही. हा पुरस्कार पटकावण्याचा मान नाशिकचे चित्रकार प्रफुल्ल सावंत यांना त्यांच्या मॉर्निंग ग्लोरी अॅट नाशिक या चित्रासाठी मिळाला.

अमेरिकेत १८६६ मध्ये या संस्थेची स्थापना झाली आहे. या संस्थेच्या स्थापनेपासून दरवर्षी अव्याहतपणे अमेरिकेमध्ये जलरंग चित्रप्रदर्शन आणि स्पर्धेचे आयोजन होते. हे प्रदर्शन जगभरातील जलरंगांत काम करणाऱ्या चित्रकारांसाठी असल्याने या स्पर्धेलाही मानाची स्पर्धा समजली जाते. यामध्ये कॅनडा, तैवान, चीन, जपान, अमेरिका, ब्राझील, स्पेन, इटली, फ्रान्स यांसारख्या कलेचा सांस्कृतिक वारसा असणाऱ्या देशांतून दिग्गज कलाकृती निवडण्यात आल्या होत्या.
हजारो चित्रांमधून शेवटी १५० चित्रे निवडण्यात आली. या दीडशे चित्रांचे परीक्षण करून त्यामध्ये ३० चित्रांना विविध पुरस्कार देण्यात आले. या पुरस्कारांमध्ये प्रफुल्ल सावंत यांना बर्ड अँड ग्रेटचेन नावाचा पुरस्कार देण्यात आला आहे. यामध्ये पदक आणि ७५० अमेरिकन डॉलर्सची रक्कम पारितोषिक म्हणून देण्यात आली.

मॉर्निंग ग्लोरी अॅट नाशिक
फुल्लइंपिरिअल म्हणजेच २२ इंच बाय ३० इंच या आकाराचे हे मोठे चित्र आहे. त्याच्या तांत्रिक बाबी पाहता, दुमजली इमारतीवर पडलेले कोवळे ऊन हा चित्राचा गाभा आहे. त्यासाठी पांढऱ्या रंगाचा वापर करता कागदाचा पांढरा रंग वापरून पारदर्शक रंगलेपन पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. दृकप्रत्ययवादी शैलीतील हे चित्र बनविण्यासाठी प्रफुल्ल सावंत यांना तीन तासांचा अवधी लागला होता, प्रत्यक्ष स्थळी साकारलेले हे चित्र आहे.

अमेरिकन वॉटर कलर सोसायटी
अमेरिकेतीलसगळ्यात मोठी आणि मानाची संस्था असून या संस्थेमार्फत फक्त जलरंगांची कामे जगभरात पोहोचावीत म्हणून प्रयत्न केले जातात. जगभरातील सगळ्या देशांतून चित्रकार या आर्ट गॅलरीमध्ये आपले चित्र प्रसिद्ध व्हावे यासाठी प्रयत्नशील असतात. न्यूयॉर्कमधील गॅलरीज ऑफ स्लमागुंडी येथे दरवर्षी हे प्रदर्शन भरविण्यात येते.
फोटो - प्रफुल्ल सावंत यांच्या मॉर्निंग ग्लोरी अॅट नाशिक या चित्राला आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान, आपल्या चित्रासमवेत प्रफुल्ल सावंत..