आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक सोडायचं नाहीय; पण....

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - ‘नाशिक मायभूमीपेक्षाही सुरक्षित आहे. पाच-सहा वर्षांपासून येथे वास्तव्य करीत आहोत. येथील लोक कुटुंबाप्रमाणे प्रेम करत असल्याने हे शहर सोडून जाण्याची इच्छा नाही; मात्र आसाममधील हिंसाचारानंतर पसरलेल्या अफवांमुळे घरच्या मंडळींची काळजी वाटत असल्याने गावाकडे परतत आहोत.’ मूळ आसामचा दपुंकन सांगत होता. अंबड-सिन्नर औद्योगिक वसाहतींसह दिंडोरी काच कारखान्यातील कामगार, बंगाली सराफी कारागीर अशा सुमारे साडेचारशे आसामींनी शनिवारी लोकमान्य टिळक टर्मिनस-गुवाहाटी एक्स्प्रेसने नाशकातून घराकडे प्रयाण केले. सर्व आसामी नागरिकांची हीच प्रातिनिधिक भावना होती.
शुक्रवारप्रमाणे ही रेल्वेगाडी मुंबईवरूनच आसामी नागरिकांनी खचाखच भरलेली होती. कसातरी नागरिकांनी गाडीत प्रवेश मिळवला. त्यांना रेल्वेच्या अधिकारी-कर्मचार्‍यांनी मदत केली. कुटुंबाच्या आग्रहाखातर ऐनवेळी नोकरी सोडून जाताना मालकांनी मात्र अध्र्या महिन्याचा पगार दिला नसल्याची तक्रार त्यांनी केली.

‘पालकांना भेटून परत या’ - ‘हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर कुटुंबीय चिंतेत असणे स्वाभाविक आहे. त्यांची चिंता दूर करण्यासाठी मायभूमीत जाऊन त्यांची भेट घ्या, नाशिक सुरक्षित असल्याचे त्यांना पटवून द्या आणि निर्धास्तपणे परत नाशिकला फिरा’, असे आवाहन भाजपचे शहर सरचिटणीस संभाजी मोरूस्कर यांनी या नागरिकांना केले. भाजप-अभाविपच्या वतीने मोरूस्कर यांच्याकडून अल्पोपहार देण्यात आला. यावेळी ‘वंदे मातरम’, ‘भारतमाता की जय’ आदी घोषणांनी रेल्वेस्थानक दणाणून गेले होते. अंबादास पगारे, संजय कोचरमुथा, उदय थोरात यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
420 तिकिटांची विक्री - नाशिकरोड स्थानकावरून शनिवारी गुवाहाटी एक्सप्रेसची 250 तिकिटांची विक्री झाली, तर 170 आरक्षणे झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या गाडीतून प्रवेश करणार्‍यांची संख्या अधिक दिसत होती. जवळपास 700 नागरिकांना अन्न पाकिटे देण्यात आली. ऐनवेळी एजंटांकडून तिकीट घ्यावे लागल्याने मूळ किमतीपेक्षा दुप्पट रक्कम मोजावी लागल्याची तक्रार या नागरिकांनी केली.
डॉ. स्वामींनी घेतली चौकसभा - आसामातील हिंसाचार व सोमवारी साजरी होणार्‍या रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी सिन्नर फाटा, मुक्तिधाम परिसर व मालधक्का रोड येथे चौकसभा घेऊन जनतेचे प्रबोधन केले. अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन डॉ. स्वामी यांनी केले.
भीती बाळगू नका - रेल्वेने प्रवास करणार्‍या आसामी प्रवाशांना ही अफवा आहे. तुम्ही कोणतीही भीती बाळगू नका. यावेळी गर्दीमुळे इतर प्रवाशांची गैरसोय होणार याची काळजी घ्या, तसेच काही अडचण आल्यास रेल्वे सुरक्षा दलाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. अतुल क्षीरसारगर, पोलिस निरीक्षक, रेल्वे सुरक्षा बल
प्रक्षोभक मजकूर; युवकास अटक - फेसबुक या सोशल वेबसाईटवरून प्रक्षोभक व दोन समाजात व्देष पसरविणारा मजकूर शेअर केल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी एका युवकाला शनिवारी अटक केली. किरण बापू पाणकर (22), असे त्याचे नाव असून तो लक्ष्मी अपार्टमेंट, टकलेनगर येथे राहणारा आहे. आसाम दंगल आणि मुंबईतील दंगलीबाबत प्रक्षोभक मजकूर पोस्ट केल्याचा आरोप या युवकावर असून पोलिसांनी त्याच्यावर भादंवि कलम 153 अ (1) आणि आयटी कायदा 2008 च्या कलम 66 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसर्‍या दिवशीही गर्दी - गुवाहटी एक्स्प्रेसमध्ये 170 व्यक्तींनी आरक्षणाद्वारे तर 115 व्यक्तींनी तातडीच्या तिकिटाद्वारे प्रवास केला. आसामी नागरिकांना कोणाचाही त्रास होऊ नये, यासाठी नाशिकरोड पोलिसांचा विशेष बंदोबस्त कायम होता. रेल्वे सुरक्षा बलाच्या दिमतीला सहा जादा पोलिसही देण्यात आले होते.
जुन्या नाशकातही संवाद - ईदच्या आगाऊ शुभेच्छा देण्याच्यानिमित्ताने पोलिस उपआयुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांच्या पथकाने नाशिकरोड, वडाळागाव व जुने नाशिक भागातील मुस्लिम बांधवांशी संवाद साधला. आसामाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही अफवेला बळी पडू नका, एसएमएसद्वारे होणार्‍या अपप्रचाराला बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले. सिन्नरफाटा, गोसावीवाडी, मुक्तिधामसमोर जामा मशीद, देवळालीगाव, वडाळागाव येथे पोलिसांनी भेटी दिल्या. यावेळी सहायक पोलिस आयुक्त संदीप पालवे, नाशिकरोड पोलिस निरीक्षक एम. एम. बागवान आदी उपस्थित होते.