आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंगार बाजारातील तब्बल 800 पेक्षा अधिक दुकाने हटवली; किरकाेळ वाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक अंबडभंगार बाजारातील अतिक्रमण निर्मूलन माेहिमेत मंगळवारी चाैथ्या दिवशी ८० दुकाने जमीनदाेस्त करण्यात अाली. महापालिका पोलिसांच्या आवाहनानंतरही अनेक भंगार विक्रेत्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढल्याने ही कारवाई करण्यात आली. एक्स्लो पॉइंट येथील दुकानांचे अतिक्रमण काढण्यात आले. किरकोळ वाद वगळता मोहीम शांततेत पार पडली.
 
या संपूर्ण माेहिमेत ८०० हून अधिक दुकाने हटविण्यात अाली. दरम्यान, भंगार बाजारात विराटनगर परिसरात प्लास्टिक लाकडी वस्तूंनी पेट घेतल्याने अाग लागली. यात एका घराचे नुकसान झाले. अग्निशमन दलाने अाग अाटाेक्याात अाणली. सुदैवाने काेणतीही जिवीतहानी झाली नाही. 
 
महापालिका अायुक्त अभिषेक कृष्णा, अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त आर. एम. बहिरम, विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत, आर. आर. गोसावी, एम. डी. पगारे यांच्या पथकाने ही कारवाई केली. अनेक व्यावसायिकांनी दुकानातील साहित्य हलविले, मात्र पत्र्यांचे शेड पक्की बांधकामे तशीच ठेवली हाेती. त्यावरही पालिकेने मंगळवारी जेसीबी फिरविला. पोलिसांच्या वतीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. किरकोळ वाद वगळता मोहीम शांततेत पार पडली. 
 
मोहीमठरली ऐतिहासिक -नाशिक शहरातीलभंगार बाजार अतिक्रमण मोहीम एक ऐतिहासिक कामगिरी ठरली. एवढे मोठे अतिक्रमण काढणे म्हणजे एक आव्हान होते. मात्र, कायद्यापुढे काहीही चालत नाही, याचे हे उदाहरण ठरले. प्रशासन काय करू शकते हेही पाहायला मिळाले. शासकीय यंत्रणेचे नियोजन एक यशस्वी मोहीम ठरली. मंगळवारी ही सर्व मोहीम फत्ते झाल्याने महापालिका पोलिस यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला. 

भंगारबाजारात पुन्हा लागली आग 
सातपूर | भंगारबाजारातील अतिक्रमण निर्मूलन माेहिमेत सातशेहून अधिक अतिक्रमणे हटविण्यात अाली अाहेत. या ठिकाणी अद्यापही साहित्य पडलेले अाहे. मंगळवारी (दि. १०) सकाळी ११ वाजेच्या सुमारास विराटनगर येथील अजमेरी चौक परिसरात प्लास्टिकच्या वस्तू लाकडी फळ्यांनी अचानक पेट घेतल्याने लागलेल्या अागीत एका घराचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. 
 
भंगार बाजार हटविण्यात अाला असून, न्यायालयाच्या आदेशाने तेथील भंगार साहित्य पालिकेची परवानगी घेतल्यानंतर नेता येत असल्याने मंगळवारी हे साहित्य स्क्रॅप व्यापाऱ्यांनी गॅस कटरच्या साह्याने काढण्याचे काम सुरू केले. व्यावसायिकांकडून यासाठी घरगुती गॅस सिलिंडरचा वापर केला जात आहे. यामुळे ठिणग्या पडून आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मंगळवारी सकाळी असेच साहित्य काढताना विराटनगर येथील अजमेरी चौकात गॅस कटरची ठिणगी उडून लाकडी साहित्य, प्लास्टिक, ज्वलनशील पदार्थाने पेट घेतला परिसरातील शेजारीच रहात असलेल्या तय्यब अली चौधरी यांच्या घरास अाग पसरली.
 
सुदैवाने यावेळी घरातील सर्व लोक वेळीच बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. मात्र, आग लागून दीड तासानंतर अग्निशामक दलाचा बंब आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. दोन तासांनंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले. अतिक्रमण हटविल्यानंतर भंगार बाजारात पडलेल्या साहित्यात ज्वलनशील पदार्थ असताना खबरदारी का घेतली जात नाही. ही अाग लागते की लावली जाते अशीही चर्चा परिसरात होत आहे. 

स्क्रॅप मटेरियल ठरेल डोकेदुखी 
भंगारबाजार हटला, मात्र यापुढे येथील स्क्रॅप मटेरियल उचलणे ही मोठी डोकेदुखी ठरणार आहे. प्रशासनाने हे मटेरियल सातपूर येथे टाकण्याचे नियोजन केले होते. मात्र, न्यायालयानेच हे मटेरियल शहराबाहेर हटविण्याचे आदेश दिले आहेत. आता ही जबाबदारी भंगार विक्रेत्यांची असून, त्यांनी मटेरियल शहराबाहेर नेताना मनपा पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे व्यावसायिकांची चांगलीच कोंडी झाली असून, यापुढे मटेरियल उचलण्यासाठी ते दिवस लागण्याची शक्यता आहे.