आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंधरा मिनिटांत पोहोचा नाशिक बायपासवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक शहरातील वाहतूक कोंडीचा भार वर्षभरात कमी होण्याची सुखद चिन्हे असून, सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरांतर्गत व बाह्य रिंगरोडचे काम 30 टक्के पूर्ण झाले आहे. मार्च 2015 पर्यंत म्हणजे सहा महिन्यांत उर्वरित काम पूर्ण होणार होणार असून, त्यानंतर परराज्यातून वा जिल्ह्यातून येणार्‍या वाहनांना तसेच शहरवासीयांनाही नाशिक शहराबाहेर पडण्यासाठी केवळ 15 मिनिटांचा कालावधी लागेल. त्यामुळे द्वारका, मुंबईनाका या महत्त्वाच्या चौकांतील वाहतूक कोंडीची समस्या तर सुटेलच; मात्र मुख्य बाजारपेठेतील चिंचोळ्या रस्त्यांचा वापरही केवळ नाशिककरांनाच करता येईल.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वेगाने काम होत असून, सोमवारी पत्रकारांसह पालिकेच्या अधिकार्‍यांनी अंतर्गत रिंगरोडची पाहणी करून नाशिककरांसाठी पर्यायी मार्ग कोणते याची माहितीही दिली. या दौर्‍यात अधीक्षक अभियंता सुनील खुने, पी. व्ही. गायकवाड, भा. ऊ. मोरे यांच्यासमवेत विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्य बाजारपेठ होईल मोकळी
सद्यस्थितीत मुख्य स्थानकाकडून म्हणजेच पंचवटीकडून शहरातील सर्व पाचही उपनगरांत बसेस जातात. या मार्गामुळे पंचवटीतून गंगापूररोड, नाशिकरोड, सिडको, सातपूर असे कोठेही जायचे असेल तर पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, शालिमार, महात्मा गांधीरोड, सीबीएस, त्र्यंबकरोड हे चौक महत्त्वाचे ठरतात. येथील अरुंद रस्त्यांवर परिवहन महामंडळाच्या बसबरोबरच रिक्षा, चारचाकी व दुचाकीचा बोजा पडतो. अंतर्गत रिंगरोडमुळे पंचवटीतून कोठेही जायचे असेल तर मुख्य बाजारपेठेला बायपास करता येईल.

अडीच किलोमीटर मार्गातील अडथळे दूर 
औरंगाबादरोडकडून संगम पूल-टाकळी गावाकडे जाणार्‍या अडीच किलोमीटर मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी अधिकार्‍यांनी शर्थीने प्रयत्न केले. सोमवारी पोलिस बंदोबस्तात औरंगाबादरोडलगत असलेल्या एका घराला हटवून काम सुरू झाले. पावसाळा सुरू झाल्यामुळे खडीकरण व मुरुमाद्वारे लेव्हलिंगचे काम सुरू झाले आहे.
 
नाशिक - पुणे मार्ग : पुण्याकडून नाशिक शहरात न जाता विजय-ममता टॉकीजकडून टाकळीगाव, औरंगाबादरोड मार्गे अमृतधामजवळून मुंबई-आग्रा महामार्गाकडे येता येईल. तेथून पुढे आग्राकडून मालेगाव, धुळे व पुढे मध्य प्रदेशकडे जाता येईल. येथून गुजरातला जायचे असेल तर अमृतधामकडून माणिकनगर, गुंजाळबाबानगर (हिरावाडी)कडून दिंडोरी वा पेठरोडला जाता येईल. 

नाशिककरांना फायदा : म्हसरूळ, मेरी, मखमलाबाद या टोकाकडील रहिवाशांना नाशिकरोडला जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करता येईल. त्यामुळे पंचवटी, रविवार कारंजा, शालिमार या भागात प्रवेश करण्याची गरज भासणार नाही. पाथर्डीफाटा वा सिडकोसाठीही वापर होऊ शकतो.
 
नाशिक - मुंबई : मुंबईकडून गुजरातला अथवा त्र्यंबकेश्वर व सप्तशृंगगडावर जायचे असेल तर, गरवारे पॉइंटजवळून अंबड एमआयडीसी मार्गे पपया नर्सरी (त्र्यंबकरोडला प्रवेश) व तेथून बारदान फाट्यामार्गे गंगापूररोडला जाता येईल. पुढे गंगापूररोडवरून पेठरोडने गुजरातकडे जाता येईल. मध्य प्रदेशकडे जाण्यासाठी लेखानगरमार्गे वडाळागाव, विजय-ममता टॉकीज, टाकळीगाव, औरंगाबादरोड, अमृतधामने मुंबई-आग्रा महामार्गावर पोहोचता येईल.

नाशिककरांना फायदा : मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपूलामुळे अंतर्गत रिंगरोडचा वापर स्थानिकांना होईल. कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा व धुळे,  जळगाव व नंदुरबार या लगतच्या जिल्ह्यातून आलेले नागरीक सिडको, सातपूर भागात वास्तव्यास आहेत. त्यांना या अंतर्गत रोडचा वापर करून मुंबई-आग्रारोडवर जाता येईल. त्यामुळे द्वारका, मुंबईनाका येथील वर्दळ कमी होईल तसेच खासगी प्रवासी वाहनांचे (जीप, टॅक्सी) सध्याचे थांबेही बदलतील. त्यामुळेही मुख्य मार्गावरील जागा मोकळी होईल.
 
अंतर्गत रिंगरोड असे
24 किलोमीटर अंतर, 13 ते 30 मीटरपर्यंत रुंदी (शंभर फुटी मार्ग), 400 कोटी एकूण खर्च
जुना गंगापूर नाका, हनुमानवाडी, मखमलाबाद-क्रांतीनगररोड, मंडलिक मळा, नवीन बाजार समिती (पेठरोड), मेरीलगत दिंडोरीरोड, हिरावाडी, गुंजाळबाबानगर, माणिकनगर, अमृतधाम (मुंबई-आग्रारोड), औरंगाबादरोड छेदून टाकळीगाव, विजय ममता टॉकीज (नाशिक-पुणारोड), पुन्हा नाशिक-मुंबई मार्गाकडे, वडाळागाव, लेखानगर, गोविंदनगर, एबीबी सर्कल, गंगापूररोड (रिंगरोड पूर्ण).
 
नाशिक - गुजरात : गुजरातकडून येणार्‍यांना मुंबई, पुण्याला जायचे असेल तर हिरावाडीमार्गे अमृतधाम, औरंगाबादरोड, विजय-ममता टॉकीजने मुख्य मार्गावर जाता येईल. तसेच पुढे वडाळागाव, लेखानगरमार्गे मुंबईकडेही रवाना होता येईल. तसेच याच मार्गाने मध्य प्रदेशकडे जाता येईल. याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर व मुंबईकडे जाण्यासाठी पुढे पेठरोडमार्गे मंडलिक मळा, हनुमानवाडी, गंगापूररोडमार्गे बाहेर पडता येईल.

नाशिककरांना फायदा : शहरांतर्गतचा त्र्यंबकरोड, कॉलेजरोड, गंगापूररोडवरील वाहतुकीचा भार कमी होईल. तसेच याच प्रशस्त रस्त्यांनी जलदगतीने दुसर्‍या उपनगरात पोहोचता येईल.
 
केंद्रीय रस्त्यांचे भाग्य उजळणार
रिंगरोडला लागून असलेल्या केंद्रीय रस्त्यांचेही यामुळे भाग्य उजळणार आहे. जेहान सर्कल ते गंगापूररोड, गोरक्षनगर ते दिंडोरीरोड, पाथर्डी गाव ते राजसारथी वसाहत यांचा यात समावेश असेल. साधारण 30, 24 व 13 मीटरपर्यंत जागेच्या उपलब्धतेप्रमाणे हे रस्ते होतील.
 
चार मोठे पूल होणार
चोपडा लॉन्स, जनार्दन स्वामी आश्रम, वालदेवी नदी,   नांदूर गावाजवळ चार पूल होणार आहेत. त्यातील वालदेवीचा 75 मीटरचा अपवाद वगळला तर 120 मीटर रुंदीचे हे पूल असतील.
 
सिंहस्थासाठी फायदा
आनंदवलीपासून तपोवनापर्यंत गोदावरीवर येण्यासाठी अंतर्गत रस्ते महत्त्वाचे ठरतील. साधुग्रामलाही जाता येईल. गोदाकिनार्‍यावर घाट विकासाची कामे सुरू केली असून, येथेही सहज प्रवेश करता येईल. 
 
मार्चपर्यंत होणार कायापालट
४अंतर्गत रस्त्यांची कामे मार्च 2015 पर्यंत पूर्ण होणार आहेत. त्यानंतर शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा भार कमी होईल, तसेच परजिल्ह्यातील वाहनेही नाशिकमध्ये येणार नाहीत.  - सुनील खुने, अधीक्षक अभियंता