आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नाशिक बर्ड फेस्ट’ची पक्षीप्रेमींसाठी पर्वणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पक्षी निरीक्षणाचा छंद जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ व नाशिक वनविभाग यांच्या वतीने 15 व 16 फेब्रुवारी या कालावधीत कुसुमाग्रज स्मारकात ‘बर्ड फेस्ट’ या पक्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात पक्ष्यांवर आधारित माहितीपट, व्याख्याने व पक्षी निरीक्षणाचे आयोजन करण्यात आल्याने हा महोत्सव पक्षीप्रेमींसाठी पर्वणीच ठरणार आहे.
या दोनदिवसीय महोत्सवात आंतरराष्ट्रीय माहितीपट दिग्दर्शक बेदी बंधू, शेखर दत्तात्री, असिमा नरेन, विलास काणे यांनी तयार केलेल्या पक्ष्यांवर आधारित माहितीपटांचे शनिवारी (दि. 15) व रविवारी (दि. 16) सायंकाळी 6 ते 9 या वेळेत सादरीकरण होणार आहे. तामिळनाडू येथील पाइंट कॅलिमर येथे येणार्‍या स्थलांतरित पक्ष्यांवर प्रकाश टाकणारा माहितीपट तसेच कर्नाटकातील म्हैसूरजवळील रंगनथिट्ट पक्षी अभयारण्यावर आणि दुर्मिळ अशा माळढोक पक्ष्यावर आधारित माहितीपट दाखविण्यात येतील. याचबरोबर महोत्सवात एका विद्यार्थ्याने तयार केलेल्या ‘बर्ड्स थ्रू माय विंडो’ हा माहितीपटही दाखविण्यात येईल. महोत्सवाच्या समारोपप्रसंगी उत्तर-पूर्व भागात पक्षी व प्राण्यांची शिकार या विषयावरील ‘दि वर्ल्ड मीट ट्रेल’ हा रिटा बॅनर्जी दिग्दर्शित माहितीपट दाखविला जाईल. अधिक माहिती www.naturwalktrust.org व www.maharashtrashtratourism.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध करण्यात आली आहे.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन अन् पक्षी निरीक्षण
महोत्सवात नाशिक परिसरातील पक्षी, रण ऑफ कच्छमधील पक्षी या विषयांवर आधारित तज्ज्ञांची व्याख्याने होतील. तसेच, दि. 16 फेब्रुवारी रोजी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सकाळी 6.30 ते 8 या वेळेत पक्षी निरीक्षणाचा कार्यक्रम होणार आहे.