आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमळाला प्रतीक्षा टवटवीची; भाजप स्थापना दिनाची औपचारिकता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महापालिकेत दशकभरापासून सत्तेत असलेल्या भाजपच्या स्थापना दिनानिमित्त 6 एप्रिलला पक्ष विस्ताराच्या दृष्टीने यंदा प्रथमच विभागनिहाय मेळावे घेण्यात आले. परंतु, यातील बहुतांश मेळावे केवळ औपचारिकता म्हणूनच साजरे झाल्याचे दिसले.

पक्षाच्या वसंतस्मृती कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाकडे खासदारांसह ज्येष्ठ नेते, बहुसंख्य नगरसेवक तसेच काही पदाधिकार्‍यांनीही पाठ फिरविल्याने मोजक्याच पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत स्थापना दिन साजरा झाला. शहरात पक्षाच्या दोन खासदारांचे वास्तव्य असून, पालिकेत सत्तेत असणार्‍या उपमहापौरांसह 14 नगरसेवक आहेत. त्यातच पक्षाच्या शहराध्यक्ष, मंडल अध्यक्षांच्या नुकत्याच निवडणुका पार पडल्या असताना स्थापनादिनानिमित्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी मोठय़ा जाहीर कार्यक्रमाची अपेक्षा होती. दुष्काळी स्थिती लक्षात घेता दुष्काळग्रस्तांना मदत निधी असो की कार्यकर्ता मेळाव्याच्या माध्यमातून दुष्काळी भागात मदतीचे आवाहन करण्याची संधीदेखील होती. मात्र, या मेळाव्यांनाही मोजक्याच पदाधिकार्‍यांची हजेरी होती व कार्यकर्त्यांची उपस्थितीही फारशी नव्हती.

पंचवटीतील मेळावा तीन तास विलंबाने
भाजप स्थापनादिनानिमित्त पंचवटी मंडलाच्या वतीने पंडित पलुस्कर सभागृहात करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्याची दुपारी चारची वेळ असताना प्रत्यक्षात कार्यकर्त्यांच्या अनुपस्थितीमुळे मेळावा तब्बल तीन ते साडेतीन तास विलंबाने सुरू करावा लागला होता. पक्षाचा वर्षानुवर्षे बालेकिल्ला मानला जाणार्‍या पंचवटीतच कार्यकर्त्यांची जमवाजमव करावी लागल्याचे चित्र दिसून आले.