आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप शहराध्यक्ष निवडीसाठी बुधवारचा मुहूर्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- भारतीय जनता पक्षाला शहराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अखेर मुहूर्त सापडला. बुधवारी ही निवडणूक होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. याच दिवशी दुपारी जिल्हाध्यक्षांचीही निवड घोषित केली जाणार आहे.

मंडल अध्यक्षांच्या निवडणुका सुरू असून, त्यापाठोपाठ शहराध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. शहराध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष लक्ष्मण सावजी, माजी अध्यक्ष विजय साने व प्रा. सुहास फरांदे, सुनील केदार यांची नावे चर्चेत असून, चौघेही निवडणुकीवर ठाम आहेत. पक्षर्शेष्ठींकडून स्थानिक पदाधिकार्‍यांना अविरोध निवडीच्या परंपरेची आठवण करून देण्यात आली असून, ती खंडित होऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, बहुतांश पदाधिकार्‍यांनी सावजी यांना विरोध दर्शवला आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता संघटन बळकटीसाठी आक्रमक नेत्याची मागणी केली जात आहे. फरांदे, साने कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव शहराध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे सांगण्यात आले.

ग्रामीण जिल्हाध्यक्षपदासाठी सहा इच्छुक
जिल्हाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल याच दिवशी जाहीर होणार आहे. यंदा प्रथमच ग्रामीण जिल्हाध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष डॉ. बाळासाहेब आहेर, विकास देशमुख (कळवण), शंकर वाघ (निफाड) यांच्यासह सहा जण इच्छुक आहेत. यावर एकमत न झाल्याने प्रदेश पातळीवरील समिती निर्णय घेईन. तो मान्य असल्याचे ठरविण्यात आले होते. हा निर्णयदेखील बुधवारी दुपारी 3 वाजता ग्रामीण पदािधकर्‍यांच्या बैठकीत जाहीर होईल. निवडणूक अधिकारी संभाजी पगारे, डॉ. राजेंद्र फडके, विठ्ठल चाटे उपस्थित राहतील.

पाटील, मानकर, राऊत मंडल अध्यक्षपदी
सिडको मंडल अध्यक्षपदी जगन पाटील, द्वारका मंडल अध्यक्षपदी सुरेश मानकर, तर सातपूर मंडल अध्यक्षपदी संजय राऊत यांची निवड करण्यात आली. सिडकोत पाच उमेदवारांतून पाटील यांची निवड झाली. सलग दुसर्‍यांदा निवड झाल्यामुळे भाजप पदाधिकार्‍यांनी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. द्वारका मंडलाच्या निवडणुकीत सुरेश मानकर यांची अध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली. तर सातपूर मंडल अध्यक्षपदी संजय राऊत यांची निवड झाली.

नाशिकरोड मंडलाची आज निवडणूक
भारतीय जनता पार्टी नाशिकरोड मंडलाची निवडणूक मंगळवारी (दि. 5) सायंकाळी 5.30 वाजता नागरिक मंडळाच्या अभिनव वाचनालयाच्या सभागृहात पार पडणार आहे. मंडल अध्यक्षपदासाठी अनेक इच्छुक असले तरी खरी लढत जयंत नारद व गजानन तितरे यांच्यात आहे. पक्षनिरीक्षक उदय वाघ यांच्या उपस्थितीत निवडणूक होणार असून, निवडणूक अधिकारी म्हणून महेश हिरे काम बघणार आहेत.