आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकला ‘बीआरटीएस’साठी गरज राजकीय इच्छाशक्तीची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘बीआरटीएस’अंतर्गत बससेवा कुणी हाताळायची यावरून सध्या नाशिक महापालिकेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतभेद सुरू आहेत. एकीकडे या राजकीय हालचाली सुरू असताना दुसरीकडे राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर मध्य प्रदेश आणि गुजरातमधील मोठमोठय़ा शहरांची वाहतूक या मार्गांवरून सुरूआहे. त्या पार्श्वभूमीवर अहमदाबाद शहरातील ओळख देणारी ही माहिती.
उत्तम दर्जा, उत्तम सेवा हे ‘बीआरटीएस’चे (बस रॅपिड ट्रांझीट सिस्टिम) ब्रीदवाक्य असल्याचे अहमदाबाद येथील प्रकल्प पाहून स्पष्टपणे जाणवते. प्रकल्प राबविण्यासाठी नेमलेल्या कंपनीमार्फतच पूर्णपणे त्याचे नियंत्रण आणि व्यवस्थापन पाहिले जाते. बस चालक आणि इतर कर्मचार्‍यांकडून प्रवाशांना वाईट वागणूक मिळाल्यास संबंधित कर्मचार्‍यांना तत्काळ दंड आकरला जातो. त्याचबरोबर बसच्या वेगाबाबतही निर्बंध घालून देण्यात आले असून, र्मयादित वेगापेक्षा वाहनाचा वेग कमी किंवा अधिक झाला तरी संबंधित चालकाला जाब विचारला जातो.
‘एसपीव्ही’ समिती स्थापन
अहमदाबाद महापालिका, आरटीओ, वाहतूक पोलिस शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रकल्पासाठी समिती स्थापन केली आहे. त्यात महापालिकेचे आयुक्त समितीचे अध्यक्ष, तर महापौर हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतात. महाव्यवस्थापक, दोन उपमहाव्यवस्थापक अशी समितीची रचना आहे. सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकार्‍याची महाव्यवस्थापक म्हणून नेमणूक केलेली आहे. ‘बीआरटीएस’ प्रकल्पातील प्रत्येक बस वातानुकूालत आणि ‘जीपीएस’ (ग्लोबल पोझिशिनींग सिस्टिम) प्रणालीने परिपूर्ण आहे. या प्रणालीच्या आधारे बसच्या मार्गाबाबतची इत्थंभूत माहिती मिळू शकते. काय आहे ‘बीआरटीएस’?
‘बीआरटीएस’ या सार्वजनिक वाहतूक सेवा पुरविणार्‍या प्रकल्पाला जनमार्ग असे दुसरे नाव आहे. या प्रकल्पांतर्गत ‘बीआरटीएस’ बसला स्वतंत्र मार्ग दिला जातो. यामुळे प्रवाशांना सुरक्षित आणि कमी खर्चिक प्रवास दिला जातो. एकूण प्रकल्प किमतीच्या 70 टक्के निधी केंद्र शासन, तर 30 टक्के निधी महापालिकेला द्यावा लागतो. ‘बीआरटीएस’ मार्गाव्यतिरिक्त त्यास समांतर असे खासगी वाहनांसाठी दोन मार्ग त्याशिवाय सायकल ट्रॅक, पदपथ, पार्किंग या सुविधादेखील दिल्या जातात. ‘बीआरटीएस’साठी 30 मीटरच्या रस्त्यात 12 मीटरचा रस्ता, 7 मीटर पदपथ, तीन ते चार मीटर सायकल ट्रॅक आणि इतर जागा वाहन पार्किंग, तसेच विक्रेत्यांसाठी ठेवली जाते.
‘बीआरटीएस’साठी चार ते पाच ‘एफएसआय’
प्रकल्प राबविण्यापूर्वी या मार्गावरील मिळकतधारकांना भूसंपादनापोटी 4 ते 5 इतका ‘एफएसआय’ (वाढीव चटईक्षेत्र) देण्यात आले. तसेच आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबांनादेखील क्षेत्रफळानुसार एक ‘एफएसआय’ देण्यात आल्याची माहिती कंपनीचे उपमहाव्यवस्थापक अखिल ब्रम्हभट यांनी दिली. प्रत्येक वर्षी एप्रिल महिन्यात इंधनाच्या चढ-उतारानुसार तिकीटदर कमी जास्त करण्याचा निर्णय समितीच्या माध्यमातून घेतला जातो. प्रत्येक सिग्नलवर ‘बीआरटीएस’साठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
तीन महिने मोफत सेवा
4अहमदाबाद येथील बससेवेत लोकसहभाग व जनजागृतीबरोबरच तीन महिन्यांपर्यंत बससेवा लोकांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्र, वास्तुविशारद, अभियंते, उद्योग व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक, कलाकार, लोकप्रतिनिधींचा सहभाग वाढविण्यात आला होता. शहरात 65 हजार ऑटोरिक्षा आणि महापालिकेच्या 560 बस असून, जवळपास 500 बस ‘बीआरटीएस’च्या माध्यमातून अल्पशा भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. अखिल ब्रम्हभट, उपमहाव्यवस्थापक, बीआरटीएस कंपनी
अहमदाबादमधील ‘बीआरटीएस’वर नजर
शहराची लोकसंख्या- 68 लाख
सन 2008 पासून प्रकल्पाला सुरुवात
प्रकल्पाची किंमत 982 कोटी, पैकी 275 महापालिकेचा हिस्सा
एकूण 72 कि.मी. ‘बीआरटीएस’ प्रकल्प
‘बीआरटीएस’अंतर्गत 140 बसमार्फत दिली जाते सेवा
एकूण सात टप्प्यांपैकी दोन टप्पे सध्या झालेत पूर्ण
तिसर्‍या टप्प्यात 35 कि.मी.चे काम हाती घेणार
दररोज 1 लाख 40 हजार प्रवाशांची वाहतूक
35 ते 40 लाख दररोजचे उत्पन्न
सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत बससेवा
‘बीआरटीएस’अंतर्गत 140 बसथांबे