आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nashik Builder Vilas Birari Arrested Dindori Police, 3 Days Police Custody

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिक विमानतळ ओली पार्टीप्रकरण, बिल्डर विलास बिरारीला पोलिस कोठडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नाशिक विमानतळावर झालेल्या ओल्या पार्टीप्रकरणी बिल्डर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष व या पार्टीचा आयोजक विलास बिरारी यांना नाशिकमधील दिंडोरी पोलिसांनी आज अटक केली. त्यानंतर बिरारी यांना दिंडोरी कोर्टात हजर करण्यात आले, कोर्टाने त्यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागातील निवृत्त मुख्य अभियंता पी. वाय. देशमुख यांच्यासह एका कार्यकारी अभियंत्याच्या मालमत्तेची गोपनीय चौकशी करण्यास एसीबीने सुरू केले आहे. मनसेचे नगरसेवक सुदाम कोंबडेंच्या तक्रारीची दखल घेत महासंचालक प्रवीणकुमार दीक्षित यांनी नाशिकच्या अधीक्षकांकडे ही तक्रार वर्ग करीत त्याची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत.

सेवानिवृत्ती वाढदिवसाचे निमित्त साधून देशमुख यांच्यासाठी विमानतळाच्या बांधकामाचे ठेकेदार विलास बिरारी यांनी आयोजित केलेल्या या साग्रसंगीत पार्टीच्या वेगवगेळ्या चर्चा रंगत आहेत. नाशिकमध्ये लवकरच उद्घाटन होणाऱ्या विमानतळावर शनिवारी मुख्य निवृत्त अभियंता पी. व्हाय. देशमुख यांच्या निवृत्तीची पार्टी रात्री दीड वाजेपर्यंत सुरु होती. बिल्डर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष विलास बिरारी यांनी ही पार्टी आयोजित केली होती. डीजेच्या धडधडाटात 250 कर्मचारी आणि अधिकारी झिंगून गेले होते. या पार्टीमुळे त्रासलेल्या गावकऱ्यांनी हा प्रकार पोलिसांना कळवला. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनीही घटनास्थळाची पाहणी केली असता दारुच्या बाटल्यांचा खच पडलेला होता.

विमानतळावरील पार्टीप्रकरणी दाखल गुन्हा आणि जिल्हाधिकाऱ्यांनी उगारलेल्या शिस्तभंगाच्या कारवाईच्या बडग्यानंतर आता राज्य उत्पादन शुल्क विभागानेही पार्टीचे आयोजक, ठेकेदार विलास बिरारी यांच्याविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता पोलिसांबरोबरच उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईलाही आयोजकांना सामोरे जावे लागणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता पी. वाय. देशमुख यांच्या निवृत्तीची पार्टी 31 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली. त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागानेही क्लब हाऊसचा परवाना एका दिवसासाठी दिला होता. त्यासाठीच्या अटींचे उल्लंघन झाल्याबद्दल बिरारींविरुद्ध हा दुसरा गुन्हा दाखल करण्यात झाला आहे. त्याचे स्वरूप विभागीय गुन्हा असल्याची माहिती अधीक्षक आवळे यांनी दिली. या प्रकरणाचा तपास प्रभारी निरीक्षक देशमुख करीत असून, त्यांच्याकडून माहिती येताच त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येईल. जिल्हाधिकारी त्यावरून त्यांचा स्वतंत्र अहवाल तयार करून तो मुख्यमंत्र्यांना आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांनाही देतील.
भारतीय सेवाशर्ती नियम 1964 च्या कलम 13 नुसार कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याला ठेकेदार किंवा व्यावसायिकांकडून गिफ्ट किंवा तारांकित पार्टी स्वीकारता येत नाही. मात्र तरीही मुख्य अभियंता देशमुख यांच्या निवृत्तीची पार्टी बिल्डर्स असोसिएशनने दिली. ज्यात शंभरावर अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. याप्रकरणी दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.