आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक व्हावी ‘ब्युरोक्रॅट्स’ची नगरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशिक अनेक बाबतीत अग्रेसर असून, जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेद्वारे प्रशासकीय अधिकार्‍यांची नगरी होण्याचा मान नाशिकला द्यावा, असे प्रतिपादन पुण्याच्या लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी आमदार दीपक पायगुडे यांनी केले.

रविवारी येथील रावसाहेब थोरात सभागृहामध्ये मनसेच्या करिअर विभागातर्फे राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2013 करिता 30 दिवसीय मोफत मार्गदर्शन व सराव परीक्षा कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या वेळी व्यासपीठावर आमदार वसंत गिते, महापौर अँड. यतिन वाघ, युनिव्हर्सल फाउंडेशनचे संचालक राम खैरनार, डॉ. जी. आर. पाटील, कुसुमाग्रज मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दुगजे, डॉ. प्रदीप पवार, जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे, गटनेत्या सुजाता डेरे, मनपा शिक्षण मंडळ सदस्य शर्वरी लथ आदी उपस्थित होते. दरम्यान, राजेंद्र शिंदे यांची असिस्टंट कमांडंट - युपीएससीकरिता निवड झाल्याबद्दल तसेच राष्ट्रीय पातळीवर अँथलेटिक्समध्ये सुवर्णपदक मिळविल्याबद्दल अंजना ठमके यांचा सत्कार करण्यात आला.

आमदार वसंत गिते यांनी या वेळी सदर शिबिरास मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हे यश आपले एकट्याचे नसून संपूर्ण पक्षाचे आहे, असे सांगत विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक विद्यार्थी उच्चपदावर असावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. उद्घाटनानंतर पहिल्या सत्रात राम खैरनार यांनी विद्यार्थ्यांना राज्यसेवा पूर्वपरीक्षा वेळापत्रक, परीक्षेचे नियोजन, अभ्यासाकरिता उपयुक्त पुस्तके व मासिके आदींची माहिती दिली. डॉ.जी. आर. पाटील यांनी परीक्षेच्या अभ्यासक्रमाची विस्तृत माहिती विशद केली. मनसे करिअर विभागाचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी प्रास्ताविकात पाच वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाचा आढावा घेतला. विक्रम कदम यांनी सूत्रसंचालन केले. श्याम बोरसे यांनी आभार मानले. कार्यक्रमास खंडेराव मेढे, बंटी कोरडे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष, विभागीय अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

उपक्रमाची पुस्तिका लवकरच मनसेच्या करिअर विभागातर्फे पाच वर्षांपासून सुरू झालेल्या या उपक्रमाची पुस्तिका सहा महिन्यांत काढण्यात येणार आहे. युपीएससी, एमपीएससी, पोलिस भरती प्रशिक्षण, स्टॉक एक्स्चेंज, भविष्यनिर्वाह निधी अशा अनेक परीक्षांविषयी माहिती, विद्यार्थ्यांचे अभिप्राय, निवड झालेल्या विद्यार्थ्यांची मनोगते आदींचा या पुस्तिकेत समावेश असेल.

सोमवारपासून मार्गदर्शनास प्रारंभ 11 फेब्रुवारी ते 11 मार्च या कालावधीत दुपारी 3 ते 5 या वेळेत सम्राट हॉटेलसमोरील एनडीसीसी बँकेच्या सभागृहात सदर विनामूल्य मार्गदर्शन शिबिरास प्रारंभ होत आहे. या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

अंजनाच्या घराची जबाबदारी स्वीकारली
आपल्या नाशिकचं नाव देशपातळीवर उंचावणार्‍या अंजना ठमकेला राहायला घर नाही, ही खरोखरीच अत्यंत दुर्दैवी बाब आहे. त्यामुळेच आता अंजनाच्या घराची जबाबदारी मनसेनेच स्वीकारली असल्याचे आमदार वसंत गिते यांनी सांगितले.