आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Central Jail Prisoner Attack On Policeman

नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्याचा पोलिसावर हल्ला, पळण्याचा प्रयत्न ठरला अपयशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - वैद्यकीय उपचारानंतर मध्यवर्ती कारागृहात (सेंट्रल जेल) कैद्यांना सोडण्यासाठी गेलेल्या कैदी पार्टीतील कर्मचारी शमुवेल लालजी देसाई यांच्यावर जन्मठेपेची शिक्षा भोगणार्‍या कैद्याने तीष्ण हत्याराने हल्ला केल्याची घटना शनिवारी सकाळी कारागृहाच्या प्रवेशद्वारावर घडली. हल्ल्यानंतर कैद्याने पळण्याचा केलेला प्रयत्न शहर पोलिस व कारागृह पोलिसांनी हाणून पाडला व या कैद्याला जेरबंद केले.

पोलिसावर हल्ला करणारा विजयकुमार आनंदकुमार रॉय (35) हा कैदी असून, मध्यवर्ती कारागृहातील जन्मठेपेच्या 11 कैद्यांसह एकूण 13 कैद्यांना शासकीय रुग्णालयात वैद्यकीय उपचारानंतर मुख्यालयाची कैदी पार्टी शनिवारी सकाळी 12 वाजेच्या सुमारास पोलिस वाहनातून (एम.एच. 15, ए.ए. 223) कारागृहात सोडण्यासाठी आली असता, पोलिसांनी दोन्ही बाजूने कडे केले. या कड्यातून वाहनातून उतरणारे कैदी एकापाठोपाठ कारागृहात सोडण्यात येत होते. पहिला कैदी आत जाताच मागून येणार्‍या विजयकुमार रॉयने हातातील तीष्ण हत्याराने कोणाला काही समजण्याच्या आत केलेला वार पहिल्या क्रमांकावर उभे असलेल्या शमुवेल देसाई (36, रा. साईकुंज सोसायटी, पंचवटी, बकल नंबर 135) यांनी चुकवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या उजव्या गालाखाली हनुवटी व जबड्यावर वार बसला. त्यानंतर दुसरा वार डोक्यावर केल्याने देसाई गंभीर जखमी झाले. या वेळी गोंधळाचा फायदा घेत रॉयने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, कैदी पार्टी व कारागृह पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. काही अंतरावर सीताराम वरे (बक्कल नंबर-1379) यांनी झडप घालून रॉयला पकडले. जखमी देसाई यांना जयराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक निरीक्षक माधवराव रोकडे तपास करीत आहेत. हल्लेखोर कैद्यास ताब्यात घेण्याची प्रक्रिया रविवारी करणार असे रोकडे यांनी सांगितले.

यांचा होता कैदी पार्टीत समावेश : कैदी पार्टीत पानसरे, माळी, देशमाने, बागुल, जगताप, चव्हाण, गुंबाडे, वारुंगसे, वरे, कोतवाल व चालक सलीम अब्बास शेख यांचा समावेश होता.