आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: सिडकोत आधार कार्ड नोंदणीवर संक्रांत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शासकीय यंत्रणेकडून विविध योजनांच्या लाभासाठी आता आधार कार्ड नोंदणी सक्तीची केली आहे. यासाठी पालिकेकडून सिडकोत दोन ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या आधार नोंदणी केंद्रातील गलथान कारभारामुळे तासन्तास थांबूनही नागरिकांना रिकाम्या हातीच घरी परतावे लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

पालिकेकडून प्रत्येक विभागीय कार्यालय आवारात स्वतंत्र केंद्र सुरू करण्यात आल. काही नगरसेवकांच्या मागणीनुसार, त्यांच्या प्रभागातही केंद्र सुरू झाले. सिडको विभागात मनपाच्या कार्यालयात केंद्र सुरू असले तरी नागरिकांची गर्दी होऊन गोंधळ होत आहे. प्रभाग 49 चे नगरसेवक तानाजी जायभावे व सुवर्णा मटाले यांनी पाठपुरावा करून प्रभागात मोगलनगर येथील सभागृहात केंद्र सुरू केले. हे केंद्र सुरू होऊन आठवडाभराचा कालावधी उलटला तरीही गर्दी कायम आहे. सोमवारी केंद्र बंद असून, त्यानंतर कधी वीजपुरवठा खंडित, तर काही वेळा फॉर्मच शिल्लक नाही, तर काही नागरिकांचा रांगेतून क्रमांक येताच आज खूप गर्दी आहे, फॉर्म ठेवून घेतो, उद्या या, असे सांगितले जाते. काही नागरिकांना तर केंद्रावर जाताच आजचा कोटा संपला, नंतर या, असे उत्तर मिळत असल्याने नागरिक संतप्त झाले आहे. या संदर्भात, नागरिकांनी नगरसेवकांकडे तक्रारी केल्या. दरम्यान, या केंद्रावर संबंधित एजन्सी चालकाने किमान दोन मशीन व पुरेसे कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणीही होत आहे.

सिडकोतील लोकसंख्या बघता आधार नोंदणीची किमान पाच केंद्रे सुरू करण्याची गरज आहे. प्रशासनाकडून शहरात 100 यंत्रे देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, अद्याप एकही यंत्र उपलब्ध झाले नाही. आधार कार्ड केंद्राच्या यंत्रांना कधी मुहूर्त लागणार, असा सवाल नगरसेवकांकडून केला जात आहे.

नियमित पाठपुरावा
प्रभाग क्र. 49 मधील व सिडको परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी आधार नोंदणी केंद्र सुरू करण्यात आले. सुरुवातीला नोंदणी सुरळीत झाली. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे केंद्राच्या कामात अडथळे निर्माण होत असले तरी प्रशासनाकडे नियमित पाठपुरावा केला जात आहे. येत्या दोन-तीन दिवसांत या कामात गती मिळेल.
-अँड. तानाजी जायभावे, नगरसेवक