आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीजेच्या नावाखाली कायदा माेडणाऱ्यांच्या अावळा मुसक्या, पर्यावरणस्नेही नाशिककरांची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने पाेलिसांनी यंदा गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण करणाऱ्या डीजेवर निर्बंध घातले असताना काही मंडळांचे मुखंड थेट न्यायालयाच्या निर्णयालाच अाव्हान देत दादागिरीची भाषा करीत अाहेत. बारा दिवस अगदी शांततेत गणेशाेत्सव साजरा झालेला असताना ही मंडळी विसर्जनाच्या दिवशी या शांततेला बाधा निर्माण हाेईल अशा कृतीच्या इराद्यात अाहेत. कायदा-सुव्यवस्थेचे अशा प्रकारे धिंडवडे उडविणाऱ्यांच्या मुसक्या अावळण्याचे कर्तव्य पाेलिसांनी काेणाचीही तमा बाळगता बजवावे, अशी मागणी पर्यावरणस्नेही नाशिककरांकडून करण्यात येत अाहे. 

महत्त्वाचे म्हणजे, डीजेसाठी बाेटावर माेजण्याइतकीच मंडळे अाग्रही असताना बहुसंख्य नाशिककर मात्र पारंपारिक वाद्यांचाच अाग्रह धरताना दिसत अाहेत. विसर्जन मिरवणुकीत वाद्यांचा आवाज किती असावा, या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही निकष निश्चित केले आहेत. यात मिरवणुकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या डीजेवर निर्बंध घालण्यात अाले अाहेत. या नियमांवर उच्च न्यायालयानेही शिक्कामाेर्तब केले अाहे. त्यामुळे या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. असे असताना काही मंडळे डीजेचा दणका उडविण्याच्या तयारीत अाहेत. राष्ट्रवादीचे नगरसेवक तथा दंडे हनुमान मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गजानन शेलार यांनी तर ‘मिरवणुकीत अाम्ही डीजे लावूच; प्रसंगी गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर,’ अशी भूमिका जाहीर केली अाहे. त्यामुळे यंदाच्या मिरवणुकीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ शकताे. 
 
नाशिककरांनी निभावले कर्तव्य; अाता मंडळांची जबाबदारी : या उत्सवात नाशिककर अाणि बहुसंख्य मंडळांनीही पर्यावरणस्नेह जपला अाहे. मूर्ती विसर्जित केल्यावर हाेणारे जलप्रदूषण राेखण्यासाठी मूर्ती संकलनार्थ विविध संस्था पुढे अाल्या अाहेत. दुसरीकडे, ध्वनिप्रदूषण राेखण्यासाठी न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे पाेलिस विभागानेही यंदा अापले कर्तव्य चाेखपणे बजावले अाहे. परंतु, उत्सवाच्या अखेरच्या दिवशी डीजेचा गाेंधळ माजवून पर्यावरणस्नेहींच्या अपेक्षांवर पाणी फिरवण्याचा प्रयत्न काही मंडळांनी सुरू केला अाहे. अशा गणेशाेत्सव मंडळांना कायदेभंगापासून राेखण्याची जबाबदारी अन्य मंडळांचीही अाहे. अन्यथा उत्सव काळात ध्वनिक्षेपकच वाजवू नये असाही अादेश प्रसंगी न्यायालयातून येऊ शकताे. 
 
अानंदापेक्षा डीजेचा त्रासच अधिक : डीजेचा माणसाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर अतिशय विपरीत परिणाम होतो. कानठळ्या बसविणाऱ्या अावाजाने बहिरेपणा येत असल्याचेही वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. विशेषत:, हदयविकाराच्या रुग्णांसाठी अशा प्रकारचे डीजे जीवघेणे ठरू शकतात. पर्यावरण समतोल बिघडण्यासही ध्वनिप्रदूषण महत्त्वाचे कारण आहे. डीजे लावून बीभत्स नृत्य करण्याचे प्रकार काही वर्षांपासून विसर्जन मिरवणुकीत वाढले अाहेत. अशा प्रकारांमुळे सहकुटुंब मिरवणूक बघायला येणाऱ्यांची संख्याही घटली अाहे. 

८० डेसिबलपर्यंतच अावाज सुसह्य 
आवाजाचीतीव्रता डेसिबल या एककात मोजली जाते. डेसिबल हे घातांकित एकक असून, दर १० डीबीने आवाजाची तीव्रता दसपटीने वाढते. उदा. २० डीबी आवाज १० डीबीच्या आवाजापेक्षा दहापट असतो, तर ३० डीबीचा आवाज १० डीबी आवाजाच्या १०० पट असतो. साधारणत: ८० डीबीपर्यंतचा आवाज मनुष्याला सहन होऊ शकतो. त्यापेक्षा मोठ्या आवाजाचा त्रास होतो. विमाने रॉकेट यांचा आवाज १००-१८० डीबीएवढा तीव्र असतो. तसेच बांधकाम, सार्वजनिक कार्यक्रम इत्यादी ठिकाणी आवाजाची पातळी १२० डीबीपेक्षा जास्त असते. 

दिव्य मराठी भूमिका 
पर्यावरणपूरक गणेशाेत्सवाचा ‘श्रीगणेशा’ झालेल्या नाशिकमध्येच कानठळ्या बसवत हृदयाची धडधड वाढवणारा प्रचंड आवाजाचा डीजे विसर्जन मिरवणुकीत धुमाकूळ घालताना दिसताे. डीजेने कर्णबधीरत्व येऊ शकतेच; शिवाय हदयविकाराचाही त्रास हाेताे. त्यामुळे ध्वनिप्रदूषण वाढविणाऱ्या डीजेला मिरवणुकीत निर्बंध घालण्यात यावेत अशीच भूमिका ‘दिव्य मराठी’ची अाहे. पाेलिसांनीही बाेटचेपी भूमिका घेता कायदे पाळणाऱ्यांवर कठाेर कारवाई करायला हवी. बेकायदेशीरपणे डीजे वाजविणाऱ्या मंडळांचे साहित्य नियमाप्रमाणे जप्त करावे. तसेच, संबंधित ‘चमकाे’ नेत्यांवर गुन्हे दाखल करावेत. गणेश मंडळांनीही अाडमुठी भूमिका घेता कायद्याच्या चाैकटीत राहून मिरवणुकीत सहभाग घ्यावा. डीजे बंदीमुळे मिरवणुकीतील हिडीस अाणि बीभत्स नृत्याचे प्रकारही बंद हाेतील अाणि नाशिककर पुन्हा एकदा सहकुटुंब मिरवणुकीचा अानंद घेऊ शकतील. 
बातम्या आणखी आहेत...