आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकरावीच्या जागा ठरणार अतिरिक्त, 79 हजार 620 जागांची जिल्ह्यात प्रवेशक्षमता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थीसंख्येच्या तुलनेत अकरावीसाठी विविध महाविद्यालये आणि आयटीआयसह इतर संस्थांमध्ये उपलब्ध असलेली प्रवेशक्षमता पाहता, चार हजार 98 जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तीर्ण झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार असल्याने विद्यार्थी व पालकांनी प्रवेशाबाबत कुठलीही चिंता व अतिरिक्त ताण न घेता नियमित प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातून यंदा 72 हजार 902 विद्यार्थी दहावीत उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्यासाठी जिल्ह्यात पारंपरिक शाखांची 259 महाविद्यालये, डिप्लोमाची 15 महाविद्यालये आणि 42 शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था अशी सर्व मिळून 79 हजार 620 प्रवेशक्षमता आहे. उत्तीर्ण विद्यार्थीसंख्येच्या प्रमाणात उपलब्ध जागा अधिक असल्याने यंदाही बहुतांशी महाविद्यालयात एकूण प्रवेशक्षमतेपेक्षा कमीच प्रवेश होण्याचे दिसून येत आहे. मात्र, पालकांना आणि विद्यार्थ्यांना याबाबत योग्य माहिती शासकीय स्तरावरून दिली जात नसल्याने अज्ञानापोटी त्यांच्यामध्ये प्रवेश न मिळण्याची धास्ती निर्माण होत आहे. यंदाही तीच गत झाली असून, शिक्षण विभागाने उपलब्ध जागा आणि विद्यार्थी क्षमता यांची माहिती प्रसिद्धच केली नाही. त्यामुळे आता विद्यार्थ्यांबरोबरच पालकांचीही धावपळ सुरू झाली आहे.

उपलब्ध प्रवेशक्षमता
नाशिक जिल्ह्यात 259 कनिष्ठ महाविद्यालयांत कला, विज्ञान, वाणिज्य आणि संयुक्त या चारही शाखा मिळून 64 हजार प्रवेशक्षमता आहे. त्यात कला शाखेच्या 31 हजार 960, विज्ञान शाखेच्या 18 हजार 560, वाणिज्यच्या 11 हजार 600, तर संयुक्त शाखेच्या 1880 जागा उपलब्ध आहेत. एमसीव्हीसीच्या 2620 जागा असून, शहरात त्यातील 780 जागांचा समावेश आहे. जिल्ह्यात डिप्लोमाची 15 महाविद्यालये आहेत. प्रत्येक महाविद्यालयात चार ते पाच विविध शाखा असून, सरासरी चारशे जागा प्रत्येकी याप्रमाणे सहा हजार जागा उपलब्ध आहेत.

तालुकानिहाय जागा
चांदवड -2000, दिंडोरी-3280, देवळा-1960, इगतपुरी -2400, कळवण-2720, मालेगाव (ग्रामीण-2966, शहर-5520), नाशिक (शहर -18600, ग्रामीण-800), निफाड-6760, नांदगाव-2440, पेठ-1200, सुरगाणा-2160, सटाणा-4280, सिन्नर-3680, त्र्यंबक-640, येवला-2760.

तर तुकड्या वाढवू
यंदा प्रवेशाला अडचण येणार नाही. अडचण आल्यास तुकड्या वाढविण्यात येतील. मात्र, विद्यार्थ्यांनी विशिष्ट कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याचा हट्ट न धरता आपल्या घराजवळील माहविद्यालयात प्रवेश घेतल्यास समस्या निर्माण होणार नाही. तुकाराम सुपे, शिक्षण उपसंचालक