आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक शहरात सोमवारी विविध आंदोलने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक -राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या शिवराळ वक्तव्याच्या विरोधात थेट त्यांच्या प्रतिमेस चपलांचा प्रसाद देत शिवसेनेने आपल्या स्टाईलने चप्पल झोड आंदोलनाद्वारे त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. या आंदोलनात शिवसेनेचे सुमारे दिडशे पदाधिकारी शिवसैनिक सहभागी झाले होते.

संपूर्ण राज्य दुष्काळाच्या खाईत पडले आहे. अशा परिस्थितीत शासनाने आणि मंत्र्यांनी जनतेला दिलासा देणे गरजेचे असताना गल्लीच्छ भाषा वापरत त्यांच्या जखमेवर मीट चोळण्याचेच काम अजित पवार यांनी केल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला. इंदापुरच्या सभेत महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यांचा कुठलाही विचार न करता 'पाणी नाही तर आता धरणात मुतायचे का' ? असे विधान केल्याने राज्यभर टीकेचे धनी झालेल्या पवार यांच्यावर नाशकातही आंदोनातून निषेध करण्यात आला. शहरातील शालीमार चौक येथे सोमवारी दुपारी 12 वाजता अजित पवार हाय..हाय.., शिवसेना जिंदाबाद, अशी प्रचंड घोषणाबाजी करत निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनात महिलांनीच पुढाकार घेत आपल्या पायातील सँडल काढून अजित पवार यांच्या छायाचित्राच्या श्रीमुखावर चपलांचा प्रसाद दिला. दरम्यान पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप करत अजित पवार यांचे छायाचित्र आंदोलनकर्त्यांकडून हिसकावून घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी अजय बोरस्ते, नगरसेवक सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, विनायक पांडे, दिलीप दातीर, शिवाजी भोर, माजी उपजिल्हा प्रमुख लक्ष्मी ताठे, शोभा गटकळ, शोभा दिवे, मंगला गोसावी, नंदा झोले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
वाहतूक झाली ठप्प
आंदोलनासाठी आलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपली वाहने रस्त्यावरच उभी केली. त्यातच चौकातच आंदोलन सुरु केल्याने काही काळ या परिसरातील वाहतुक ठप्प झाली होती. जवळपास अर्धा तास चाललेल्या आंदोलनानंतर पोलीसांनी मध्यस्थि केल्याने वाहतूक सुरळीत झाली.
उपमुख्यमंत्र्यांच्या पोस्टरला शिवसैनिकांनी मारले जोडे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी केलेल्या वक्तव्याचा शिवसैनिकांनी निषेध करून त्यांच्या पोस्टरला शिवाजी पुतळा चौकात जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या नेतृत्वाखाली जोडे मारले. यावेळी विरोधाच्या घोषणा देण्यात आल्या. नगरसेवक शैलेश ढगे, नितीन चिडे, शिवा ताकाटे, शिवाजी भोर, बाबा बच्छाव यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
दुष्काळग्रस्तांच्या भावना दुखावणारे वक्तव्य
अजित पवार यांनी केलेले वक्तव्य म्हणजे दुष्काळग्रस्तांच्या भावना दुखावणारे आहे. त्याचा शिवसेना जाहीर निषेध करते. मात्र आगामी 2014 च्या निवडणुकांत जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल.
विजय करंजकर, जिल्हाप्रमुख, शिवसेना
संभाजी ब्रिगेडतर्फे राज ठाकरेंचा निषेध
मराठा आरक्षणास विरोध करणार्‍या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा संभाजी ब्रिगेडने निषेध केला आहे. शिवाजी महाराज व मराठा समाजाच्या नावावर राजकारण केले, तेच आरक्षणाला तसेच शिवस्मारकास विरोध करतात, असे प्रदेश संघटक गणेश कदम, कार्याध्यक्ष सुभाष वाघ यांच्या नेतृत्वाखाली विभागीय महसूल आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. मुंबईतील छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील महामोर्चात सर्व मराठा संघटना, नेते एकत्र आल्याने अनेक पक्ष, नेत्यांच्या छातीत धडकी भरली आणि त्यामुळेच राज ठाकरे विरोध करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. शिष्टमंडळात वसंत बरकले, संतोष टिळे, अनिल वडघुले, अनिल पाटील, सुनील पाटील, मिलन पाटील आदींचा समावेश होता.
राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा

मराठा समाजा विरोधात बेताल वक्तव्य करुन समाजाची खिल्ली उडविणार्‍या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर थेट गुन्हा धाखल करा. अशी मागणी छावा संघटना, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड या मराठा समाजाच्या संघटनांच्या वतीने आंदोलन करुन जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

मराठा आराक्षणासंदर्भात 4 एप्रिल रोजी आझाद मैदानावर मराठा संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. ठाकरे कुंटूबियांसोबत गेल्या 40 वर्षापासून मराठा समाज असतानाही राज यांनी केलेले विधान म्हणजे, समाजाची खिल्ली उडविणारे असेच आहे. त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या असून ठाकरे समाजात तेड निर्माण करत असल्याचा आरोप संघटनांच्या वतीने करण्यात आला. तसेच जोरदार घोषणाबाजीही करत यानंतरही कुठल्याही राजकीय नेत्याने मराठा समाजाविरोधी बोलु नये. अशीही मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात योगेश निसाळ, नितीन रोटे पाटील सहभागी होते.