आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानसेवेसाठी केंद्रीय मंत्र्यांना क्रेडाईचे साकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक विमानतळ तयार असून, त्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी विविध परवानग्या घेण्याची गरज आहे. त्यासाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने देशाच्या एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया व ब्युरो ऑफ सिव्हिल सिक्युरिटी यांच्याकडे विविध परवानग्यांसाठी अर्ज केले आहेत. या प्रक्रियेला गती मिळावी आणि नाशिककरांना विमानसेवा लवकर उपलब्ध व्हावी, या उद्देशाने क्रेडाई नाशिकच्या पदाधिका-यांनी केंद्रीय नागरी विमान उड्डयणमंत्री गजपती राजू यांची भेट घेतली.

खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली क्रेडाईचे रा ष्ट्रीय अध्यक्ष शेखर रेड्डी, महारा ष्ट्र अध्यक्ष अनंत राजेगावकर, नाशिकचे अध्यक्ष जयेश ठक्कर, सचिव नरेश कारडा यांच्या शिष्टमंडळाने राजू यांची भेट घेतली.

खासदार हेमंत गोडसे एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याबाबत आणि नाशिकच्या औद्योगिक विकास आणि पर्यटनाकरिता या विमानतळाचे
महत्त्व किती अधिक आहे, याबाबत माहिती दिली.

आंध्र प्रदेश व कर्नाटक येथून हजारो साईभक्त शिर्डीला येतात, केवळ आंध्र प्रदेशातूनच दररोज 60 व्हॉल्वो बस शिर्डीला येत असतात, विमानतळ सुरू झाल्यानंतर या भक्तांना जलदसेवा मिळेल आणि नाशिक ते शिर्डी अशी शटल सेवा कशी देता येईल, याची जबाबदारी स्थानिक घटक सक्षमतेने पेलतील याकडे क्रेडाईच्या पदाधिका-यांनी राजू यांचे लक्ष वेधले. दरम्यान, विमानतळाकरिता ज्या परवानग्या देणे अद्याप बाकी आहेत, त्या लवकरात लवकर मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन राजू यांनी दिले.

घोटी-सिन्नर-त्र्यंबकमार्गे गुजरात महामार्गाचा प्रस्ताव
या शिष्टमंडळाने केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचीही भेट घेतली. घोटी, सिन्नर या रस्त्याचा व गुजरातशी नाशिकचा असलेला दुवा स्पष्ट करताना हाच रस्ता जर त्र्यंबकेश्वरमार्गे गुजरातसाठी निर्माण केला गेला, तर त्याचा फायदा दोन्ही राज्ये जोडण्यासाठी होणार असल्याचा प्रस्ताव गडकरी यांच्यासमोर ठेवला. या रस्त्याला रा ष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्याची मागणीही केली. याबाबत मार्ग काढण्याचे आश्वासन गडकरी यांनी दिले.