आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताळेबंद : स्थायी समितीच्या अंदाजपत्रकातील वाढ सापडणार वादात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - तिजोरीत खडखडाट व उत्पन्नाचे स्रोत घटल्यानंतरही स्थायी समितीकडून वाढ होऊन महापालिकेचे तब्बल 2965 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक 5 जुलै रोजी होणा-या महासभेवर मान्यतेसाठी आले आहे. गतवर्षी 2753 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक महासभेने मंजूर केल्यानंतर प्रत्यक्षात 1303 कोटी रुपयांचीच कामे झाली होती. त्यात यंदा उत्पन्न घटल्यामुळे अंदाजपत्रकातील वाढ वादात सापडण्याची चिन्हे आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडसर व स्थायी सभापतिपद निवड लांबणीवर पडल्यामुळे सन 2014-15 या आर्थिक वर्षातील अंदाजपत्रक महासभेवर मान्यतेसाठी आले नव्हते. त्यामुळे कामे रखडल्याचा आरोप करीत नगरसेवकांची धुसफूस सुरू झाली होती. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिताही सप्टेंबरमध्ये लागण्याची भीती असल्यामुळे प्रशासनही धास्तावले होते. अशा स्थितीत महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी स्थायीने मंजूर केलेले अंदाजपत्रक नगरसेवकांना पाठवले. सर्व नगरसेवकांना अंदाजपत्रकाच्या प्रति मिळाल्यानंतर आता 5 जुलै रोजी महासभा घेऊन त्यास मान्यता घेतली जाणार आहे. आयुक्तांनी स्थायीसमोार 1875 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. त्यात शासकीय अनुदानाचे 274 कोटी, कॅश क्रेडिटचे 334 कोटी, तर उचल 303 कोटी असे 713 कोटी महत्त्वाचे आहेत. स्थायीने त्यात वाढ करून 2965 कोटी रुपयांपर्यंत अंदाजपत्रक नेले आहे. आतापर्यंत 908 कोटी रुपयेच प्राप्त झाल्यामुळे व एकूणच आर्थिक स्थिती पाहता यंदाही उत्पन्नाचा 1800 कोटींचा आकडा पार होतो की नाही, अशी भीती विरोधी नगरसेवकांकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर 5 जुलै रोजी होणा-या अंदाजपत्रकातील आकडेमोडीचा हिशेब नगरसेवकांकडून घेतला जाण्याची शक्यता आहे.

मागील वर्षीही घरघर
गेल्या वर्षी महापालिका आयुक्तांनी 1556 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर सादर केले. त्यात स्थायी समितीने वाढ करून महासभेवर 2359 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक पाठवले. महासभेने चर्चा करून 2753 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक अंतिम केले. प्रत्यक्षात त्यातील 1134 रुपयांचे अंदाजपत्रकच अंमलात आले.

फसवी आकडेवारी
- अंदाजपत्रकाचा फुगवटा फसवा आहे. आतापर्यंत 908 कोटी जमा असून, स्थायीची वाढ व अंमलात येणा-या अंदाजपत्रकात प्रचंड तफावत असेल, असे चित्र दिसते. याबाबत महासभेत प्रशासनाला जाब विचारला जाईल. सुधाकर बडगुजर, विरोधी पक्षनेता