आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये ‘अर्पण’चे आंदोलन दडपले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- रामवाडीमार्गे होणार्‍या नियमबाह्य अवजड व एस.टी. वाहतुकीचे वृत्त बुधवारी ‘दिव्य मराठी’च्या डीबी स्टारमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर अर्पण सामाजिक संस्थेने अशा वाहतूक बंदीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन केले. मात्र, हे आंदोलन दडपण्याचा पवित्रा पोलिसांनी घेतला. एखाद्या सराईत गुन्हेगारांचा पाठलाग करावा तसे अर्पणच्या कार्यकर्त्यांचा पाठलाग करत त्यांनी कारवाई केली.

‘दिव्य मराठी’च्या बुधवारच्या अंकात ‘एसटीचा शॉर्टकट रहदारीस कटकट’ या मथळ्याखाली शहरातून महापालिका क्षेत्रातील रहदारीच्या रस्त्यांवरून अवजड वाहनांनी जाऊ नये या नियमाला धरून शहरातील वाहतूक व्यवस्थेवर प्रकाश टाकला होता. याच आधारे अर्पण संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. दरम्यान, संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, अजय बागुल, योगेश जाधव, नीलेश रौंदळ, सुमीत शिंदे, अजय सूर्यवंशी यांना अटक केली.

रामवाडी रस्त्यावरून अवजड आणि एसटी बस वाहतुकीस बंदी आहे. ही वाहतूक द्वारकामार्गे नेण्याचे स्पष्ट आदेश आहेत. तरी पेठ, गुजरात, कळवणमार्गे येणार्‍या गाड्या अशोकस्तंभमार्गे रामवाडी पुलावरून जातात.

या प्रकारावर वाहतूक पोलिस, एस.टी. प्रशासन यापैकी कोणीच कारवाई करत नाही. या वाहतुकीचा सर्वसामान्यांना होणार्‍या त्रासाचे वृत्त बुधवारी ‘डी.बी.स्टार’मध्ये प्रसिद्ध झाले. त्यावर ‘अर्पण’ने तीन शाळा आणि महाविद्यालयाच्या हितासाठी आंदोलन करत या मार्गाने अनधिकृत बसेसला अडविले. यामार्गे वाहतुकीची परवानगी तुम्हाला आहे का? अशी विचारणा चालकांना करण्यात आली. कार्यकर्त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर अडविलेल्या सहापैकी एकाही बसचालकाकडे नव्हते.

अखेर वरिष्ठांशी चर्चेसाठी बस तेथेच थांबविण्याचा निर्णय आंदोलनकर्त्यांनी घेतला. उत्तर मिळेपर्यंत भूमिका ठाम ठेवली; परंतु पोलिस उपायुक्त साहेबराव पाटील, सहायक पोलिस आयुक्त गणेश शिंदे, वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाजीराव भोसले यांनी कर्मचार्‍यांसह येऊन हे आंदोलन उधळून लावले.

निवेदन देऊनही कारवाई नाही
अर्पण संस्थेने पंचवटी पोलिसांना या अनधिकृत बसवाहतुकीस बंदीविषयी निवेदन दिले. पोलिसांनी त्याकडे ना लक्ष दिले ना दखल घेतली. लोकशाही मार्गाचे आंदोलन मोडीत काढले. अडविलेल्या बसलाही सोडून देत पोलिसांनी कार्यशून्यता दाखवली.

पोलिसांच्या शिव्या आणि मार
आंदोलनस्थळी पाऊण तास उशिरा आलेल्या पोलिसांनी काहीच विचारपूस न करता, पूर्वकल्पना न देता शिवीगाळ करत आंदोलकांना अटक केली. येथून जाणार्‍या बसचालकांना दंड किंवा कारवाई न करता बसला सोडून देण्यात आले. कार्यकर्त्यांना मात्र दंडुक्यांचा मार खावा लागला.