आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik City Business Men Make Capacitors For Nuclear Plant

अमेरिकेच्या नाकारानंतर जिद्दीने नाशिकच्या उद्योजकाने बनविली अणुभट्ट्यांसाठी कॅपेसिटर्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात पोखरण येथे झालेल्या अणुचाचणीनंतर अमेरिकेने अणुभट्ट्या आणि रॉकेट लॉन्चर्समध्ये वापरले जाणारे तंत्रज्ञान भारताला देण्यावर निर्बंध घातले. हीच देशाला स्वयंपूर्णतेकडे नेणारी संधी असल्याचे ओळखून, त्यासाठी आवश्यक एनर्जी स्टोअर कॅपेसिटर्स आपल्याच देशात उत्पादित करण्याची खूणगाठ बांधत मारूती कुलकर्णी यांनी ‘रेक्टिफेज कॅपेसिटर्स’ ही कंपनी उभारली. त्यांची उत्पादने आज संरक्षण क्षेत्रातील उत्पादन संस्थांकडून वापरली जातात.
देशाला या क्षेत्रात स्वयंपूर्ण करणारे, जिद्द आणि कठोर मेहनतीने त्यांनी मिळविलेल्या यशाचे हे अतुलनीय उदाहरण आज ‘मेक इन इंडिया’चे वारे देशात वाहत असताना तरुणांना प्रचंड प्रेरणा देणारे ठरणारे आहे.

सिन्नरजवळील ग्रामीण भागात माळेगाव एमआयडीसीत त्यांनी हा उद्योग उभारला. त्यात दोन पद्धतीच्या कॅपेसिटर्सचे उत्पादन केले जाते. एनर्जी स्टोअर कॅपेसिटर्स ते संरक्षण विभागाला देतात. त्याबरोबरच वॉटर कुल्ड कॅपेसिटर्स उत्पादित केली जातात. ती जगातील ४९ देशांत निर्यातीची किमयादेखील त्यांनी साधली आहे. वडील आयटीआयला शिक्षक आणि आई गृहिणी अशा अगदी सर्वसामान्य कुटुंबातजन्मलेल्या मारूती कुलकर्णी यांनी डिप्लोमापर्यंत शिक्षण पूर्ण केले आणि नोकरी सांभाळली.
शक्ती कॅपेसिटर्स ही कंपनी बंद पडल्यानंतर त्यांनी स्वत:चा उद्योग भागीदारीत सुरू केला. नेमकी याचवेळी वाजपेयी सरकारने पोखरण येथे दुसरी अणुचाचणी केली. त्यानंतर जगभरातून भारतावर दबाव येऊ लागला आणि अमेरिकेने अणुचाचणीच्या काही प्रक्रियांकरिता आवश्यक असलेली एनर्जी स्टोअरेज कॅपेसिटर्स भारताला देण्यावर बंदी घातली. यातूनच कुलकर्णी यांनी ही कॅपेसिटर्स आपणच देशात का उत्पादित करू नये, असा प्रश्न स्वत:ला विचारला आणि त्याच प्रयत्नांमध्ये स्वत:ला झोकून दिले. आज रॉकेट लॉन्चर्स, पाणबुडी, अणुभट्ट्यांच्या महत्त्वाच्या तपासणीकरिता आवश्यक ही कॅपेसिटर्स ते देशातील संरक्षण क्षेत्रात कार्यरत राष्ट्रीय संस्थांना पुरवितात.

प्रत्येक कर्मचाऱ्याकडे कार, कर्जमुक्त घरे :प्रत्येक कर्मचारी हा कर्मचारी नाही, तर कंपनीचा मालक म्हणून सगळ्या प्रकारची कामे करतो. त्यामुळे सुपरवायझर, सीनियर, ज्युनिअर असा भेद निर्माण करणारी पदेही आमच्याकडे नाहीत. विशेष म्हणजे, कंपनीत दहा वर्षे पूर्ण करणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांकडे एक रुपयाही कर्ज नसलेली स्वत:ची हक्काची घरे आहेत आणि कारही हे कुलकर्णी आवर्जून सांगतात. भागीदार प्रवीण मिरजकर हे मार्केटिंगचे काम सांभाळतात.
४९ देशांत निर्यात

वॉटरकुल्ड कॅपेसिटर्सची निर्मितीदेखील कुलकर्णी यांच्या कंपनीत होते, जी तुर्कस्थान, रशिया, जर्मनी, इटली, अर्जेंटिना, इंग्लंड, ब्राझीलसह ४९ देशांत निर्यात होतात. त्यातून विदेशी चलन देशाला मिळते.

विदेशी चलन वाचवितो

जी कॅपेसिटर्स देशातील संरक्षण उत्पादनांकरिता वापरली जातात, ती आयात करावी लागत होती. त्याकरिता प्रचंड विदेशी चलन देशाला खर्च करावे लागत होते, ते आता अल्प प्रमाणात खर्च होते. त्यातून विदेशी चलनाची होणारी बचत हीदेखील तितकीच महत्त्वाची ठरत आहे.