आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनारोग्य : स्वच्छता उपाययोजनांवरून अधिका-यांची कानउघाडणी; महापौरांकडून झाडाझडती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘साथ पसरल्यावरच जागे का होता?’, ‘सफाई कर्मचारी वर्ग करण्याचे अधिकार असताना आयुक्तांच्या मंजुरीची वाट पाहण्यामागे हेतू काय?’ ‘सह्याजीराव सफाई कर्मचा-यांवर कारवाईसाठी हात का कापतात?’, अशा प्रश्नांचा भडिमार करीत महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी आरोग्याधिका-यांपासून विभागीय अधिका-यांपर्यंत सर्वांचीच झाडाझडती घेतली. उपमहापौरांच्याच प्रभागात डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळल्याने महापौरांनी पेस्ट कंट्रोल, धूरफवारणीसह अन्य स्वच्छता उपाययोजनांचा आढावा घेतला. महापौरांचा आक्रमक पवित्रा पाहून अधिका-यांची बोलतीच बंद झाली.

यंदाही डेंग्यूने अचानक तोंड काढल्यामुळे नाशिककरांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे. या पार्श्वभूमीवर महापौरांनी बुधवारी बैठक घेत प्रारंभीच ‘उपमहापौरांच्या प्रभागात डेंग्यूचे नेमके संशयित रुग्ण किती’, असा प्रश्न विचारला. आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाने यांनी आधी ‘चार’ व नंतर ‘सहा’ असे उत्तर दिले असता महापौरांनी थेट सफाई कर्मचा-यांच्या बदल्यांना हात घातला. ‘20 जूनला महासभेत अतिरिक्त कर्मचा-यांना वर्ग करण्याबाबत दिलेल्या आदेशाचे काय झाले’, अशी पृच्छा केल्यानंतर बुकाने यांनी 17 कर्मचा-यांची नावे मिळाल्याचे सांगताच महापौरांनी ‘पश्चिम प्रभागात 300 कर्मचारी असताना 17 कर्मचा-यांचीच नावे कशी आली. कर्मचारी वर्ग करण्याचे अधिकार तुम्हाला असताना आयुक्तांच्या परवानगीचा घाट का’, असा समाचार घेत कारवाईचे आदेश दिले.

महापौर प्रभागसेवेला 70 कर्मचारी : ‘माझ्या प्रभागातील स्वच्छतेसाठी 70 कर्मचारी कोणत्या निकषावर दिले’, ‘अतिरिक्त कर्मचा-यांना कशाला पोसता’ असे प्रश्न महापौरांनी केल्यावर विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांनी ‘अनेक कर्मचारी रजेवर असतात’, असा खुलासा केला. तेव्हा ‘कारवाईचे कामही महापौरांनीच करायचे का’, असा सवाल वाघ यांनी केला.
निविदा काढण्यासाठी कोणाची वाट? : पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याची मुदत 8 जुलैला संपत आहे. नवीन ठेक्यासाठी निविदा काढली असून, त्यास तातडीने स्थायी समितीची मंजुरी घ्या, अशी सूचना महापौरांनी केली. मंजुरीसाठी कोणाची वाट पाहत आहात, असा थेट प्रश्न त्यांनी केला.

‘डबके साचल्यास कारवाई’
मोठ्या इमारतींचे टेरेस, तसेच शौचालयांसाठी तयार केलेल्या खड्ड्यांत पाण्याचे डबके पाणी साचून डासांची उत्पत्ती होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आरोग्य व नगररचना विभागाने पाहणी करून संबंधित मिळकतधारकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश उपमहापौर सतीश कुलकर्णी यांनी दिले. नगररचनाचे कार्यकारी अभियंता व आरोग्याधिकाºयांना कारवाईबाबत कडक ताकीद देतानाच कोणाचीही गय करू नका, अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

वडाळा भागात डेंग्यूचे सहा संशयित रुग्ण आढळल्यानंतर उपमहापौर कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत बांधकामांबरोबरच नागरिकांनाही दोषी धरले. पाथर्डीरोड येथील हाजी बिल्डवेल कन्स्ट्रक्शनच्या इमारतीत डासांची अंडी सापडल्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचे आदेश आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाने यांनी दिले. दरम्यान, पंचवटीतील अश्वमेघनगरमधील 20 वर्षीय तरुणाला डेंग्यूची लागण झाल्याचे बुधवारी निष्पन्न झाले.

अशा केल्या सूचना
> प्रभागातील घाण व कच-याचे ढीग तत्काळ उचला.
> घंटागाडीबाबतच्या तक्रारींचे निराकरण करा.
> नदी-नाल्याजवळ डास प्रतिबंधक फवारणी व धुरळणी करा.

डास उत्पत्तीला त्वरित हवा प्रतिबंध
- शहरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीचे रोग उदभ्वण्याची चिन्हे आहेत. त्यावर आरोग्य विभाग उपाययोजना करीत असून, नागरिकांनी पाण्याचा साठा स्वच्छ ठेवून डास उत्पत्तीला प्रतिबंध करावा. - अ‍ॅड. यतिन वाघ, महापौर

फोटो - स्वच्छतेबद्दल महापौरांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर काहीही उत्तर नसल्याने अधिका-यांना माना खाली घालून सारे ऐकून घ्यावे लागले.