आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांकडे करणार टीपी योजनेची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहर विकास आराखड्याऐवजी (डेव्हलपमेंट प्लॅन) नगर विकास आराखडा तयार करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्याचा मनोदय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स, असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनीअर्स आणि आर्किटेक्ट्स अँण्ड इंजिनीअर्स असोसिएशनच्या वतीने बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला.

शासनाने आदेशित केल्यानुसार नवीन प्रारूप शहर विकास आराखडा हा सर्वसमावेशक करतानाच भविष्यात वाढणार्‍या शहरीकरणाचा दर लक्षात घेऊन त्याचे नियोजन असावे, अशी मागणीही या संघटनांनी केली. यासंदर्भात या तिन्ही अभियंता आणि वास्तुविशारद संघटनांची बैठक होऊन त्यात नवीन शहर विकास आराखड्याविषयी शहरवासीयांच्या असलेल्या अपेक्षांबाबत चर्चा करण्यात आली.

डीपीऐवजी टीपी प्लॅन राबविल्यास त्यात सर्वांना समान न्याय मिळू शकेल. तसेच, नगररचनाही सुटसुटीत होऊन भविष्यातील नेटके शहर साकारणे शक्य होऊ शकते. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची संघटनांच्या वतीने भेट घेऊन मागणी केली जाणार असल्याचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टसच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष नीलेश चव्हाण यांनी सांगितले. बैठकीला अनुप मोहबंसी, प्रदीप काळे, रसीळ बोथरा, ज्ञानेश्वर गोडसे, पुनीत राय, अनिल कडभाने आदी उपस्थित होते.

प्रारुप आराखडा तयार करण्याविषयी लोकांकडून आलेल्या तसेच शहराच्या दृष्टीने योग्य अशा सूचनांची माहिती विभागीय नगररचना विभागाला सादर केली जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे.

फेसबुकवर पेज सुरू करणार
शहर विकास आराखड्याच्या अनुषंगाने अभियंता व वास्तुविशारद संघटनांनी लोकसहभागासाठी सोशल नेटवर्किंगचा आधार घेतला आहे. फेसबुकवर नाशिक डीपी नावाने पेज सुरूकरणार असून, nashikdp@gmail.com हा इ-मेल केला आहे. त्याचप्रमाणे वैराज कलादालन, नगररचना विभागात सूचना पेटी ठेवली असल्याची माहिती असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग नाशिकचे अध्यक्ष विजय सानप यांनी दिली.