आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात स्वच्छतेसह औषध फवारणीही करा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहरात आरोग्याचा प्रश्न गंभीर असून, डेंग्यू, मलेरिया व साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळावे यादृष्टीने जुने नाशिक, उपनगर, व्दारका, भाभानगरसह अशोका मार्ग परिसरात दोन वेळा औषध फवारणी करा तसेच पूर्व विभागातील सर्वच ठिकाणाचे कचरा स्पॉट त्वरित काढून टाकावेत, असे आदेश पूर्व विभागीय सभापती वंदना शेवाळे यांनी आरोग्य स्वच्छता निरीक्षकांना दिले. लोकांनी डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांना घाबरू नये तसेच आपल्या घरातील साचलेले पाणी त्वरित काढावे, असे आवाहनही शेवाळे यांनी केले.

मेनरोड येथील पूर्व विभागीय कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत सभापती वंदना शेवाळे यांनी अधिकार्‍यांसह स्वच्छता निरीक्षकांना परिसर स्वच्छ करण्याचे आदेश दिले. पूर्व विभागात प्रत्येक प्रभागात दोन वेळा घंटागाडी जात आहे, प्रत्येक परिसरातील कचर्‍याचे स्पॉट काढण्यात आल्याचे आरोग्य अधिकारी पी. डी. पाटील यांनी सांगितले. तसेच धुर फवारणी व औषध फवारणी प्रत्येक विभागात सकाळ-सायंकाळ सुरू असून, मलेरिया विभागाच्या वतीने मोहीमही सुरू असल्याचे मलेरिया विभागाचे अनिल पाटील यांनी सांगितले.

विभागीय अधिकारी मालिनी शिरसाठ यांनी पूर्व विभागातील सर्वच ठिकाणी पाहणी करून स्वच्छतेबाबत अधिकार्‍यांना सूचना केल्याचे सांगितले. आरोग्य अधिकारी पी. डी. पाटील, मलेरिया विभागाचे अनिल पाटील, स्वच्छता निरीक्षक के. जी. पटेल, डी. जी. बोडके, के. डी. पवार, विक्रम दोंदे आदी अधिकारी उपस्थित होते.

..तर कडक कारवाई करणार
पूर्व आणि पश्चिम विभागाच्या वादात महापौरांच्या प्रभागात येत असलेल्या सराफ बाजार, कपाड बाजार येथे अनेक दिवसांपासून ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर वाहत आहे. यासंदर्भात सभापती शेवाळे यांच्याकडे वारंवार तक्रारी येत असल्याने त्यांनी तत्काळ त्याठिकाणी जाऊन पाहणी केली. विभागीय अधिकारी मालिनी सिरसाठ यांना पश्चिम विभागाच्या विभागीय अधिकारी जयर्शी सोनवणे यांच्याशी बैठक घेऊन याठिकाणी सुरू असलेल्या पूर्व आणि पश्चिम विभागाच्या वादाचा निपटारा करून या परिसरात स्वच्छता करावी, असे आदेश दिले. स्वच्छता न झाल्यास संबंधित अधिकार्‍यांवर कडक करवाई करण्यात येईल असेही सांगितले.