आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिक शहरात नजर जाईल तिथं खड्डा..!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - पावसाळ्यात खड्ड्यांतून वाहन चालवणे नाशिककरांच्या जणू पाचवीलाच पुजले आहे. यंदाही पहिल्या झडीनंतरच रस्त्यांचे बारा वाजले आहेत. या रस्त्यांची डागडुजीही दरवर्षीचीच. मात्र, या मलमपट्टीमुळे करदात्यांचा पैसा वाया जातोच, पण खड्ड्े तसेच राहिल्याने व तेच अपघातांचे कारण बनल्याने मन:स्तापही होतो. सार्वजनिक बांधकाम विभागाचे काही अधिकारी आणि ठेकेदारांमधील संगनमतामुळे रस्त्यांचा दर्जा घसरतच असल्याने दरवर्षी कोट्यवधींचा निधी खड्डय़ातच जात आहे.
असे असते रस्त्याचे आयुर्मान - खडीकरण केलेल्या रस्त्याचे आयुष्य तीन वर्षांपर्यंत असते. त्यानंतर किमान सहा महिन्याने त्यांची देखभाल-दुरुस्तीची गरज असते. त्याचप्रमाणे डब्ल्यू.बी.एम. व सिलिंग कोट असलेला रस्ता पाच वर्षांपर्यंत टिकतो. बीएमएसी रस्त्याचे आयुष्यमान सात ते दहा वर्षे, तर कॉँक्रिटच्या रस्त्याचे आयुर्मान 50 वर्षे असते; रस्ता बांधकामासाठी कोणत्या दर्जाचे साहित्य वापरले जाते, त्यावरच त्या त्या रस्त्याचे आयुष्यमान ठरत असते.
गतवर्षी 100 कोटी खर्च - शहरासह परिसरातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी महापालिकेतर्फे गतवर्षी 15 कोटींची तरतूद करण्यात आली होती. यंदाही तेवढीच तरतूद असून, याशिवाय तत्काळ कामे करण्यासाठी प्रत्येक विभागीय कार्यालयांसाठी 40 लाखांची तरतूद करण्यात आलेली आहे. मागील वर्षी 100 कोटींचा निधी केवळ रस्ते कामांसाठी खर्च झाला असून, या व्यतिरिक्त ठेवींमधील पाच कोटी रुपये महापालिकेने रस्त्यांसाठी खर्च केले आहेत. सन 2012-13 या आर्थिक वर्षात नवीन रस्त्यांसाठी 60 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, देखभाल व दुरुस्तीसाठी 15 कोटी रक्कम असूनही तिचा योग्य वापर का होत नाही, असा यक्षप्रश्न नागरिकांना पडलेला आहे.
शहर अभियंत्यांना दिले खड्डे दुरुस्तीचे आदेश - महापौर अँड. यतिन वाघ द्वारका भागात कामानिमित्ताने गेले असता खड्डेमय रस्त्यांची अवस्था त्यांना दिसली. महापालिकेमध्ये येताच शहर अभियंता सुनील खुने यांना बोलावून तत्काळ खड्डे दुरुस्त करण्याची सूचना केल्याचे त्यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. शहरात सर्वच भागांमध्ये खड्डय़ांची ही समस्या निर्माण झालेली आहे. यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्याचेही महापौरांनी मान्य केले.
गुणवत्ता नियंत्रण हवे - रस्त्याच्या प्रकारानुसार त्याचा दर्जा ठरविला जातो. ठेकेदार आणि महापालिकेत होणार्‍या करारानुसार निर्धारित कालावधीत (डिफेक्ट लायबिलिटी पीरियड) रस्ता खराब झाल्यास देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदारावर असते. करारभंग झाल्यास ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकले जाते. दर्जेदार व टिकाऊ काम होण्यासाठी वापरल्या जाणार्‍या मटेरिअल्सची गुणवत्ता तपासण्याची गरज असते. रस्त्याचे काम सब बेस, सब ग्रेड, क्रस्ट आणि वेअरिंग कोट या चार भागात केले जाते. ते प्रमाणशीर न झाल्यास व रस्ता खराब होऊन त्यावर खड्डे पडू शकतात. रस्त्यावर पाणी साचू नये, यासाठी रस्त्याला उतार देऊन दोन्ही बाजूने पाणी वाहून जाणारे ड्रेनेज असायला हवे. किमान डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर पाणी साचू नये. मोहन रानडे, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता
असे होते गुणवत्ता नियंत्रण - खडीकरण, डांबरीकरण आणि कॉँक्रिटीकरण अशाप्रकारे रस्त्यांची कामे केली जातात. यासाठी वापरल्या जाणार्‍या बाबींची वेगवेगळ्या पद्धतीने तपासणी केली जाते. खडीकरण रस्त्यांसंदर्भात त्याची जाडी व दर्जा तपासला जातो. त्यामुळे खडीकरणाचा थर आणि खडी किती वापरली आहे हे कळते. डांबरीकरणाची कामे सुरू होताना त्यातील डांबराचे प्रमाण किती आहे हे शोधले जाते. त्यासाठी गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळेत नमुने तपासले जातात. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा तपासणी होते. कॉँक्रिटीकरणासाठी कोणत्या दर्जाचे सीमेंट वापरले आहे हे तपासण्यासाठी क्यूब (सीमेंटचा ठोकळा) भरून तो 24 ते 48 तासांपर्यंत पाण्यात ठेवला जातो. त्यानंतर क्यूब फोडून त्याचा भक्कमपणा तपासला जातो. महापालिकेच्या प्रयोगशाळेत डांबर व सीमेंटची शंभर टक्के तपासणी केली जाते. संजय अग्रवाल, उपअभियंता, गुणवत्ता व नियंत्रण