आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरची प्रतीक्षा, रुग्णांना शिक्षा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - जिल्हा शासकीय रुग्णालयात बाह्य रुग्ण तपासणी विभागाची (ओपीडी) वेळ सकाळी आठ वाजेची. प्रत्यक्षात साडेनऊ वाजले तरी डॉक्टरांचा पत्ता नसतो. रुग्णांच्या रांगा असताना दीड-दीड तास डॉक्टर फिरकत नाहीत. डॉक्टरला देवासमान मानणार्‍या रुग्णांची जराही फिकीर निव्वळ ‘सरकारी बाबू’ झालेल्या या मंडळींना नसते. सर्वसामान्यांचा आधार असलेल्या ‘सिव्हील’मध्ये दिव्य मराठीने केलेले ‘स्पेशल इन्व्हिस्टेगेशन’

‘वेळ 8 ते 12’ असा फलक असलेला ओपीडी सकाळी आठ वाजता उघडण्याची कोणतीही चिन्हे नव्हती. दर्शनी असलेला सहाय्यता कक्ष बंद; मात्र केसपेपर कक्ष सुरू होता. कर्मचार्‍याने केसपेपरवर लिहून दिल्यानुसार रुग्णांनी पहिल्या मजल्यावरील संबंधित दालनात जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा साडेआठ वाजेपर्यंत सफाईच सुरू होती. सफाई कर्मचार्‍याला ‘डॉक्टर कधी येतील’ असे विचारले तर त्याने नेहमीचा अनुभव लक्षात घेत ‘येतील दहा-साडेदहापर्यंत’ असे सांगून टाकले. या कर्मचार्‍यांना झाडलोटीबरोबरच रुग्णांचे प्रश्न झेलण्याचे कामही करावे लागत होते.

रुग्णांकडे पाठ; दुसरीकडे पोथीपाठ : आठवड्यातून एकदा अपंगांना प्रमाणपत्र देण्यासाठी थाटलेल्या कक्षाची बेफिकिरीही पुन्हा उघड झाली. नऊ वाजेपर्यंत कक्ष उघडलेला नव्हता. अपंग तिष्ठत उभे होते. कक्ष समन्वयक प्रशांत गायकवाड एका बंद केबिनमध्ये चक्क पोथी वाचत बसले होते. दिव्य मराठी चमू पाहिल्यानंतर त्यांनी तातडीने खालच्या कक्षात जाऊन रुग्णांच्या प्रमाणपत्रांची तपासणी सुरू केली.

कधी होणार चेकअप? : सरकारी वा खासगी नोकरीसाठी अनिवार्य असलेल्या ‘मेडिकल चेकअप’साठी सकाळी सात वाजेपासून काही कर्मचारी आले होते. दोन पोलिसांनी तर चार दिवसांपासून चकरा मारत असल्याचे सांगितले. रमाबाई आंबेडकर विद्यालयातील विद्यार्थिनीही चेकअपसाठी उभ्या होत्या.

तिकडे उपक्रम, इकडे उपेक्षा
बुधवारी जगभरात जागतिक सिकलसेल दिनानिमित्त अनेक उपक्रम होत असताना सिकलसेलच्या जनजागृतीसाठी सुरू केलेल्या कक्षात मात्र समुपदेशकाव्यतिरिक्त कोणीही नव्हते. येथील डॉक्टर कधी येतील याची नेमकी वेळ समुपदेशकांनाही सांगता आली नाही.

हे तिघे आले ‘पहिले’
ओपीडीत सर्वप्रथम नेत्ररोग विभागाचे डॉ. दिनेश ढोले आले, तेव्हा नऊ वाजून 20 मिनिटे झाली होती. त्यांच्यानंतर बालरोगतज्ज्ञ विभागातील डॉ. एस. एम. कांडेकर व पाठोपाठ त्वचारोग विभागातील डॉ. ऋत्विक पाटील आले. या तिघांनी ‘सकाळपासूनच रुग्णालयात आलोय, मात्र अन्य तपासणीत व्यस्त असल्याने विलंब झाला’, असे कारण पुढे केले.

कोठे होते डॉक्टर?
प्रश्न : आपण ओपीडीच्या वेळेत का येत नाही ?
डॉ. ढोले : सकाळी अन्य वॉर्डात तपासणीसाठी जावे लागते. तसे जिल्हा शल्य चिकित्सकांचे आदेशही आहेत. 24 तास ‘ऑन कॉल’ असून गरज पडेल तेव्हा सेवा देण्यासाठी आम्ही तत्पर असतोच.

डॉ. कांडेकर : कक्षात येण्याआधीच कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करावी लागते. आयसीयूमध्ये काही रुग्णांची तपासणी करतो. त्यानंतर वेळ पडली तर अतिरिक्त थांबून ओपीडी पूर्ण केली जाते.

डॉ. पाटील : माझी नियुक्ती अलिकडेच झाली आहे. मी सकाळी 7 वाजेपासूनच येतो. मात्र, पुरुष शस्त्रक्रिया विभागात तपासणी करावी लागते. दोन्हीकडे लक्ष दिले नाही तर सगळ्याच रुग्णांची गैरसोय होते.

सिव्हिल सर्जन म्हणतात, ‘मीच दिलीय डॉक्टरांना मुभा’
सकाळी 8 वाजता ओपीडी सुरू असल्याचा बोर्ड असला तरी, डॉक्टरांना साडेनऊ-दहापर्यंत येण्याची मुभा आपणच दिल्याचे स्पष्टीकरण सिव्हील सर्जन डॉ. रवींद्र शिंगे यांनी केले. ‘यात शासनालाही काही हरकत नाही व मलाही नाही’, असे उत्तर देऊन त्याचे सर्मथन करताना ते म्हणाले, ‘डॉक्टर सकाळी 9 वाजता सिव्हीलमध्ये येतात. माझ्या दालनातील रजिस्टरमध्ये सही करतात व त्यानंतर थेट वॉर्डातील रुग्णांच्या तपासणीसाठी जातात.’ त्यावर ‘ओपीडीत रुग्णांची फसगत करणारा बोर्ड का?’ व ‘रुग्ण महत्त्वाचे नाहीत का?’ असे प्रश्न विचारता डॉ. शिंगे यांनी वॉर्डातील रुग्णांपेक्षा ओपीडी तपासणी दुय्यम असल्याचेही सांगितले. जिल्हा रुग्णालयातील बेबंदशाहीला सबळ पुष्टी देणाराच जणू हा कबुलीजबाब.