आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या आहाराची हेळसांड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक: मागील काही दिवसांपासून मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. मला एकदाही दूध किंवा शेंगदाण्याचा लाडू मिळालेला नाही. ऑपरेशन होऊन 10 दिवस उलटले. मात्र, मला उकडलेले अंडे पाहायलाही मिळाले नाहीत. कधी-कधी केवळ वरण-भातावरच भागविले जाते. या प्रतिक्रिया आहेत शासकीय रुग्णालयात उपचार घेणार्‍या रुग्णांच्या. ठरवून दिलेले अन्न रुग्णांना देण्यातच येत नाही. मग हे अन्न जाते कुठे? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्हा रुग्णालयातील रुग्णांनी तक्रार केल्यानंतर डी. बी. स्टारने रुग्णालयाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. शनिवारपासूनच नाश्ता, दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळी प्रतिनिधीने रुग्णालयाला भेट देत जेवणातील पदार्थांची पडताळणी केली. अनेक रुग्णांना जेवणात वरण-भात, एक भाजी आणि चपातीच मिळाल्याचे, तर काहींना केवळ वरण-भातच मिळाल्याचे यात स्पष्ट झाले.
नियमाप्रमाणे शनिवारी, मंगळवारी आणि गुरुवारी दुपारच्या जेवणासोबत रुग्णांना लाडू, खिचडी देणे बंधनकारक आहे. जेवणात मागील सहा महिन्यांपासून अंडी देणेही बंद झाल्याचे आहार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. मात्र, रुग्णालयातील डाएट चार्टवर जेवणाबरोबर अंडी देण्याची नोंद झालेली दिसते. मग अंडी गेली कुठे? हा प्रश्न कायम आहे.
वॉर्डन आणि नर्सचे दुर्लक्ष
रुग्णांना जेवण हवे असल्यास त्यांना संबंधित वॉर्डमधील वॉर्डन किंवा नर्सकडे याची नोंदणी करावी लागते. रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना याची माहिती नसते. त्यांना माहिती देण्याची जबाबदारी वॉर्डन किंवा नर्सची आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जाते. रुग्णांना याची माहिती नसल्याने त्यांना पोषक आहारापासून वंचित राहावे लागते आहे.
रुग्णांची अवहेलना
शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणार्‍या रुग्णांना कर्मचार्‍यांकडून चांगली वागणूक मिळत नसल्याचीही तक्रार रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे. पोषक आहार देणे सोडाच; परंतु कर्मचारी अरेरावीची भाषा करतात. ज्या रुग्णांचे नातेवाईक नाहीत त्या रुग्णांना उपचार सोडून रांगेत थांबून जेवण घ्यावे लागते. उपचारासाठी दाखल होणारा रुग्ण आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याने त्यांची रुग्णालयात अवहेलना केली जाते, असा रुग्णांचा आरोप आहे.
पाच ते सहा वेळेस जेवण करावे
एक वेळच्या जेवणातून वरण-भात, भाजी प्रत्येकी एक वाटी, दोन चपात्या असल्या तर 350 किलो कॅलरीज ऊर्जा मिळते. नाश्त्यात एक वाटी उसळ आणि दोन पाव असतील 200 ते 250 किलो कॅलरीज ऊर्जा मिळते. अशी दिवसभरात 950 किलो कॅलरीज ऊर्जा मिळते. त्यामुळे दिवसभरात पाच ते सहा वेळेस जेवण करणे आवश्यक आहे.
डॉ. पल्लवी महाजन, आहार तज्ज्ञ