आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Cleaning Employees Work With Black Ribbons On Body

एल्गार : काळ्या फिती लावून नाशकात घंटागाडी कर्मचाऱ्यांचे काम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुने नाशिक - अपघातात मृत्यू झालेल्या घंटागाडी कामगाराच्या कुटुंबाला ठेकेदार प्रशासनाने तातडीने आर्थिक मदत करावी, तसेच त्या कुटुंबातील सदस्याला कामावर घ्यावे, या मागणीसाठी घंटागाडी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी कन्नमवार पुलाजवळील कार्यालयात आंदोलन पुकारले. या आंदोलनात महापालिका प्रशासनाचा आयुक्तांचा काळ्या फिती लावून काम करून निषेध करण्यात आला.
घंटागाडी कामगार श्रावण सोमा टोंगारे (३८, रा. आनंदवली) यांचा गुरुवारी घंटागाडीवर काम करीत असताना हिरावाडीत अपघाती मृत्यू झाला होता. या मृत कामगाराच्या कुटुंबीयास तातडीने आर्थिक मदत करावी, यासाठी घंटागाडी कर्मचाऱ्यांनी नातेवाइकांनी गुरुवारी राजीव गांधी भवनसमोर आंदोलन केले होते. मात्र, या प्रकरणी योग्य तो तोडगा निघाल्याने शुक्रवारी पंचवटी विभागातील घंटागाडी कर्मचाऱ्यांनी कन्नमवार पुलाजवळील कार्यालयात आंदोलन पुकारले. या वेळी करण्यात आलेल्या आंदोलनात कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून प्रशासनाचा आयुक्तांच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध केला.
या आंदोलनामुळे पंचवटी विभागातील घंटागाड्या सकाळी १० वाजेपर्यंत कचरा जमा करण्यासाठी गेल्याच नव्हत्या. काही वेळाने घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करून महापौरांशी भेट घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर घंटागाड्या रवाना करण्यात आल्या. या वेळी प्रशासनाने स्वीकारलेल्या कर्मचारीविरोधी धोरणाविरोधात कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता.
माथाडी संघटनेचा पाठिंबा

घंटागाडी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार संघटनेचे जिल्हा चिटणीस अंबादास जोशी यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. तसेच, कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारे अन्याय होऊ देणार नसल्याचे या वेळी सांगितले.
ठेकेदार देणार एक लाखाची मदत

अपघाती मृत्यू झालेल्या घंटागाडी कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयास एक लाखाची मदत ठेकेदाराकडून देण्यात येणार आहे. शुक्रवारी महापौरांच्या निवासस्थानी घंटागाडी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ ठेकेदारासोबत महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.

घंटागाडी कामगार श्रावण सोमा टोंगारे गुरुवारी काम करत असताना कारच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर मदतीसाठी गुरुवारी राजीव गांधी भवनसमोर, तर शुक्रवारीही काळ्या फिती लावून आंदोलन केले. या आंदोलनानंतर दुपारी महादेव खुडे यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने ‘रामायण’ बंगल्यावर महापौर अशोक मुर्तडक, उममहापौर गुरुमित बग्गा, विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण, आरोग्याधिकारी सुनील बुकाने यांची भेट घेतली. मदतीसंदर्भात चर्चा केली. या वेळी ठेकेदाराने एक लाख रुपयांची मदत त्या कर्मचाऱ्याच्या पत्नीला कामावर ठेवण्याचे मान्य केले. या निर्णयानंतर शिष्टमंडळाने समाधान व्यक्त केले.
कर्मचाऱ्यांना अडवले गेटवरच : महापौरांच्या निवासस्थानी भेटण्यासाठी घंटागाडी कर्मचारी आले होते. मात्र, सकाळी महापौर कामानिमित्त बाहेर गेल्यामुळे कर्मचाऱ्यांना गेटवरच अडविण्यात आले होते. काही वेळानंतर उपमहापौर गुरुमित बग्गा हे ‘रामायण’ बंगल्यावर आल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांना आत प्रवेश दिला गेला.

विमा काढणे बंधनकारक : दरम्यान,या, तसेच सोमेश्वर येथील गटारीच्या चेंबरमधील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या कामासाठी काढण्यात येणाऱ्या टेंडरमध्ये कर्मचाऱ्यांचा विमा काढणे बंधनकारक करण्यात येणार असल्याचे या वेळी झालेल्या चर्चेत महापौरांनी स्पष्ट केले.