आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाडू झडती: ‘साफसफाई एक तास, बाकी टाइम पास’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुने नाशिक; कामचुकारपणात सफाई कामगार अधिकार्‍यांपेक्षाही एक पाऊल पुढे असल्याचे जुन्या नाशिकमध्येही दिसून आले. हजेरी सकाळी 6 वाजता असते मात्र कर्मचारी येतातच 7 वाजता. अनेकजण, तर गैरहजरच असतात. तर काही जण सह्या करतात, पण कामाचा पत्ता नसतो. या भागाचा ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने मांडलेला हा लाइव्ह रिपोर्ट.

कुणाचा धाकच नाही
आपल्या घरासमोरच झाडू मारणार्‍या कर्मचार्‍यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, आमचे काम रस्त्यावर झाडू मारण्याचे आहे, तेच आम्ही करतो आहे. तर खडकाळी भागात एका नागरिकाला झाडू चांगला नसल्याचे उत्तर मिळाले.

थेट संपर्क साधावा
पूर्व विभागात कार्मचारी कमी आहेत. 750 कर्मचारी गरजेचे आहेत. आयुकत्तांना पत्र दिले आहे नागरिकांनी अडचणींसंदर्भात थेट आधिका-यांशी संपर्क साधावा.
-पी.डी.पाटील, स्वच्छता निरिक्षक पूर्व विभाग

पूर्व विभागातील कर्मचारी संख्या
सफाई कर्मचारी: 495
मुकादम: 09
निरीक्षक: 07
अधिकारी: 01
गैरहजर: 8
वैयक्तिक रजा: 12

भिकार्‍यांकडून स्वच्छता
काही कर्मचारी एवढे निर्ढावलेले आहेत की, ते भिकार्‍यांना पैसे देऊन परिसरात साफसफाई करतात. जर भिकार्‍यांनी काम केले नाही, तर त्यांना ते बसत असलेल्या जागेवर बसूही देत नसल्याचे काही नागरिकांनी सांगितले.

सकाळी 6.30
फुले मार्केट येथील हजेरी शेडवर मुकादमाने कर्मचार्‍यांची हजेरी घेतल्यानंतर बाहेर पडतानाच काही कर्मचार्‍यांनी भद्रकाली पोलिस ठाण्याजवळ चहाच्या टपरीवर पहिला ‘स्टॉप‘ घेतला. त्यानंतर काहीवेळ गप्पा मारल्यानंतर कामाची सुरुवात करण्यात आली.

सकाळी 7.15
दोन कर्मचारी फुलेमार्केट परिसरात स्वच्छता करत पुढे गेले. शाही मशीद येथे फक्त रोडवर असलेल्या घाणीवर झाडू फिरविण्याचे नाटक झाले. पुढे खडकाळी परिसरातील काही महिला कर्मचार्‍यांनी आपल्या घरापुढीलच परिसर स्वच्छ केला.

सकाळी 7.45
कर्मचारी जीन मंझीलजवळ गेले, तेथे साचलेला कचरा त्यांनी पाहिला; मात्र पाहिले न पाहिल्यासारखे करत ते गप्पा ठोकत पुढे निघून गेले. संपूर्ण विभाग तसाच. कुठे घाण, तर कुठे थोेडी स्वच्छता असाच राहिला.