आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकहून पावसाळ्यातच पाणी साेडा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, वाद पेटण्‍याची चिन्‍हे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - वैजापूर, गंगापूर तालुक्यांची तहान भागवण्यासाठी एक्स्प्रेस कॅनाॅलद्वारे १५०० दलघनफूट पाणी पावसाळ्यातच साेडावे, असे अादेश अाैरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नाशिकच्या पाटबंधारे विभागाला दिले अाहेत. पिण्याच्या पाण्याबाबत मागणी असल्याने पाणी साेडावेच लागेल, असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात अाले. त्यामुळे नाशिक- मराठवाडा पाणी वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे अाहेत.

गेल्या वर्षी नाशिकहून पाणी साेडण्यावरून मराठवाडा व नाशकात वाद पेटला हाेता. यंदा मुबलक पावसाने धरणे भरली आहेत. जायकवाडीतही ६०.७०० टीएमसी पाणी नाशिकमधून साेडण्यात अाले. त्यामुळे धरणात सध्या ६५% पाणीसाठा अाहे. परंतु गंगापूर व वैजापूर तालुक्यांना मात्र अजूनही पाणीप्रश्न भेडसावत अाहे. या पार्श्वभूमीवर पावसाळ्यातच या तालुक्यांसाठी नाशिकमधून पाणी साेडावे, अशी मागणी करत वैजापूरचे राष्ट्रवादीचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, सतीश चव्हाण, सुभाष झांबड यांनी उपाेषणाचा इशारा दिला हाेता. त्याची दखल घेत अाैरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ पाणी सोडण्याचे आदेश नाशिक पाटबंधारे विभागाला दिले आहेत.

सध्या पुराचे (ओव्हरफ्लो) पाणी खालील भागास नदीमार्गे सुरूच आहे. ते पाणी कालव्याद्वारे वळविता येईल. तसेच ओव्हरफ्लोचे पाणी बंद झाल्यास अाैरंगाबाद, वैजापूर, गंगापूरसाठी असलेल्या मुकणे आणि भावली या धरणातून त्यांच्या आरक्षणातून पाणी सोडले जाईल, असे पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात अाले. या कालव्यांसाठी खरिपाचेही आवर्तन देय आहे. त्यामुळे त्यांना पाणी देण्याबाबत तशी कुठलीही अडचण नसल्याचे पाटबंधारे विभाग सांगत आहे.
कॅनाॅलने पाणी साेडणार
अैारंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी १५०० दलघनफूट पिण्याच्या पाण्याची मागणी केली आहे. वैजापूर-गंगापूर तालुक्यांना ते एक्स्प्रेस कॅनॉलने सोडण्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यासाठी नांदूर-मधमेश्वर कालव्याच्या अभियंत्यांकडून मागणी होताच ते सोडले जाईल. सध्या १२०० क्युसेकने नदीतून विसर्ग सुरू आहे. हेच पाणी कॅनॉलला वळवू. कमी पडल्यास त्यांच्या आरक्षणातूनच भावली व मुकणे धरणातून सोडू.
- राजेंद्र शिंदे, कार्यकारी अभियंता, नाशिक पाटबंधारे विभाग
बातम्या आणखी आहेत...