आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: आग विझवताना शिकस्त; सहा जवानांना दुखापत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- कॉलेजरोडवरील जलाराम स्वीट्स मार्टला बुधवारी सकाळी सातच्या सुमारास आग लागली. ती विझवण्याच्या प्रयत्नात अग्निशमन दलाचे पाच जवान भाजले. पोटमाळ्यावर चढण्यासाठी पुरेशा जागेअभावी आग विझवण्यात अडचण आल्याने या घटनेची सखोल चौकशी करणार असल्याचे अग्निशमन अधिकार्‍यांनी सांगितले.

‘नेमीवरम’ इमारतीतील या दुकानातून मोठय़ा प्रमाणात धूर बाहेर पडत असल्याचे काही नागरिकांनी पाहिले. संचालक अमीत पुजारा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुकानातील कामगार स्वच्छता करीत असताना पोटमाळ्यावर साहित्य घेण्यासाठी गेला असता त्यास धूर दिसला. दोन कामगारांनी तातडीने अग्निरोधक यंत्राद्वारे आग विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र एकदम भडका होऊन आग पसरली. दहा-पंधरा मिनिटांत अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. फोमची गन उघडत नसल्याने विलंब होऊन धुराचे प्रमाण वाढले. तसेच, पोटमाळ्याकडे जाणारा जिना छोटा असल्याने आग विझवण्यास विलंब होऊन ती वाढतच गेली. जवानांनी वेळीच सिलिंडर व इतर साहित्य हलवल्याने अनर्थ टळला.

जवान रुग्णालयात : पोटमाळ्यावर जाणे मुश्किल असताना अग्निशमन दलाच्या तीन जवानांनी जीवाची पर्वा न करता आग विझविण्याची उपकरणे, पाईप घेऊन जिन्यातून वर चढण्याचा प्रयत्न केला. मात्र, अरुंद जागेमुळे आच लागून त्यांचा चेहरा व हात भाजले. आणखी तीन जवानांना पोटमाळ्यावरून साहित्य खाली टाकताना व धुराला वाट करून देण्याच्या प्रयत्नात जखमा झाल्या. तीन तासांत आग आटोक्यात आली. राजेंद्र नाकील, भीमाशंकर खाडे, अशोक सरोदे, प्रदीप बोरसे, विजय नागपुरे व हेमंत बेलगावकर या जखमी जवानांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले.े अग्निशमन अधिकारी अनिल महाजन स्वत: मदत कार्यात सहभागी झाले होते.

तेथे भट्टी असावी
आतील उष्णता बाहेर पडण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने आग वाढली असावी. तेथे डिझेलभट्टी असण्याचीही शक्यता आहे. दुकानदारांनी हवा खेळती राहण्याची, तसेच रहिवासी भागात व्यवसाय करताना पुरेशी काळजी घ्यावी.
-अनिल महाजन, अग्नि. अधिकारी

केवळ खाद्यपदार्थ
पोटमाळ्यावर ज्वलनशील पदार्थ वा डिझेल भट्टी नव्हती. केवळ फरसाण, वेफर्सचे पुडे आणि शीतपेये ठेवलेले असतात. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी.
-अमीत पुजारा, संचालक, जलाराम


प्रतिबंधक योजनाच नाही
‘जलाराम’ला उत्पादनाची परवानगी नाही. अग्निप्रतिबंधक उपाययोजनाही नाही. संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. दुकाने, इमारतींचा सव्र्हे करणार आहोत.
-रमेश धोंगडे, सभापती, स्थायी समिती

कारवाई करणार
परवाना नसताना उत्पादन व अनधिकृत बांधकामाबद्दल नगररचना विभागाला कारवाईचे आदेश दिले जातील.
-संजय खंदारे, आयुक्त