आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Compost Fertilizer Use In President Rose Garden

राष्ट्रपती भवनातील गुलाब बाग बहरणार नाशिकच्या कंपाेस्टरने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘झीरोवेस्ट नाशिक’ संकल्पनेचा ध्यास घेतलेल्या नाशिकच्या युवकांनी ‘अर्थ केअर डिझाइन युनिट’च्या माध्यमातून कचर्‍याच्या समस्येवर तोडगा काढणारे कंपोस्टर युनिट तयार केले आहे. घरगुती कचर्‍यातून उच्च प्रतीचे सेंद्रिय खत निर्माण करणार्‍या या युनिटचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केवळ कौतुकच केले नाही, तर त्यांनी राष्ट्रपती भवनात वापरण्यासाठी १० कंपोस्टरही मागविले आहेत. त्यामुळे यापुढे आता तेथील बहुचर्चित गुलाबाची बाग नाशिकच्या खताने बहरणार आहे.

मोठ्या शहरांप्रमाणेच नाशिकमध्येही कचर्‍याची समस्या दिवसेंदिवस अधिकच बिकट होऊ लागली आहे. त्यावर उपायशोधून ‘झीरो वेस्ट शहर’ करण्यासाठी अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट संस्थेने ‘अर्थ केअर डिझाइन युनिट’ तयार केले आहे. कचर्‍याची समस्या सोडविणे हे एखाद्या संस्थेचे काम नसून, ती प्रत्येकाची जबाबदारी आहे. या जाणिवेतूनच घरगुती कचर्‍यातून सेंद्रिय खतनिर्मिती करणारे कंपोस्टर युनिट तयार करण्यात आले आहे. फूड वेस्ट कचरा असो की इतर कचरा असो, त्यातून खतनिर्मिती करणे शक्य झाले असून, त्यामुळे कचर्‍याचा जटिल प्रश्न मार्गी लागणार आहे. अभिव्यक्ती संस्थेचे नितीन परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वरूप दंडनाईक, प्रफुल्ल गोसावी, सुभाष उगले यांनी हे कंपोस्टर तयार केले आहे.

असे आहेत कंपोस्टर
दोन कंटेनर (डबे) जोडून कंपोस्टर युनिट तयार करण्यात आले आहे. त्यातील एका डब्यात रोज तयार होणारा कचरा, निर्माल्य, उरलेले अन्न, सडलेला भाजीपाला, झाडांचा पालापाचोळा टाकला जातो. त्यावर (लाकडाचा भुसा, दुर्गंधी कमी करणारी पावडर रासायनिक घटक) यांचे मिश्रण असलेली कंपोस्ट डस्ट पावडर टाकली जाते. साधारण एका कुटुंबासाठी एक कंटेनर महिनाभरासाठी पुरतो. कंटनेर भरला की, त्याला उलटे फिरवून दुसर्‍या कंटेनरमध्ये कचरा टाकला जातो. दुसर्‍या महिन्यात हा कंटेनर भरल्यानंतर पहिल्या कंटेनरमध्ये सेंद्रिय खत तयार होते. हे खत आपण घराच्या आवारातील झाडांसाठी किंवा परसबागेसाठी वापरू शकतो. एका महिन्यात आठ ते दहा किलो उच्च प्रतीचे खत तयार होते. कंटेनरची किंमत पाच हजार रुपये असली तर अभिव्यक्तीतर्फे साडेचार हजार रुपयांत ते विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे.

प्रदर्शनात राष्ट्रपतींनी केले कौतुक
राष्ट्रपती भवनात ते १३ मार्च या कालावधीत इनोव्हेशन एक्झिबिशन भरले होते. देशभरातील नावीन्यपूर्ण वस्तू तयार करणार्‍यांना खास निमंत्रित करण्यात आले होते. राष्ट्रपतींनी नाशिकच्या कंपोस्टरची कार्यपद्धती पाहून कौतुक केले. स्वच्छतेसाठी हे कंपोस्टर उपयोगी असल्याने त्यांनी राष्ट्रपती भवनासाठी खास १० कंपोस्टर मागविले होते. त्यानंतर संस्थेने २५ एप्रिलला हे युनिट पाठविले.