आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस चिंतन शिबिरासाठी पुन्हा मुहूर्ताचा शोध सुरू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांचा समाचार घेण्यासाठी पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी तसेच चिंतनासाठी जिल्हा कॉँग्रेसच्या वतीने आयोजित शिबिर दोन वेळा रद्द झाले. आता त्यासाठी पुन्हा नव्याने मुहूर्त शोधला जात आहे. त्यातच जिल्ह्याचे प्रभारी अँड. गणेश पाटील यांच्या उपस्थितीत शहर व जिल्ह्याच्या पदाधिकार्‍यांची एकत्रित बैठक येत्या रविवारी आयोजित करण्यात आली आहे.

लोकसभा-विधानसभा निवडणुकीत विरोधकांकडून कॉँग्रेसला केंद्र व राज्य सरकारमधील भ्रष्टाचारासह विविध मुद्यांवर विरोधी पक्ष कोंडीत पकडण्याची शक्यता लक्षात घेत त्यांच्या आरोपांना उत्तरे देण्यासाठी पक्षाच्या वतीने पदाधिकार्‍यांचा अभ्यास वर्ग घेण्याचे ठरविण्यात आले. यामध्ये पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी नाशिक जिल्ह्याचे विभागीय चिंतन शिबिर 2 जून रोजी सापुतारा येथे आयोजित करण्यात आले होते. त्याआधी मे महिन्याच्या पहिल्या सप्ताहात हे शिबिर निश्चित झाले होते. पहिल्या शिबिराच्यावेळी केंद्रीय पक्ष निरीक्षकांचा दौरा ऐनवेळी रद्द झाल्याने शिबिर स्थगित करण्यात आले. त्यापाठोपाठ दुसर्‍यावेळी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या मतदारसंघातच पोटनिवडणूक असल्याने ते अनुपस्थित राहणार असल्याचे कारण पुढे करीत चिंतन शिबिर रद्द झाले; आता पुन्हा चिंतन शिबिरासाठी मुहूर्ताचा शोध घेतला जात आहे.

प्रभारींच्या उपस्थितीत रविवारी बैठक
येत्या रविवारी (दि. 9) जिल्ह्याचे प्रभारी अँड. पाटील यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आजी-माजी पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, आघाडी प्रमुख, लोकप्रतिनिधी यांची बैठक घेण्यात येणार आहे. कॉँग्रेस समितीच्या कार्यालयात दुपारी 1 वाजता बैठक होणार असून या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन उपाध्यक्ष रमेश कहांडोळे व सरचिटणीस प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड यांनी केले आहे. याप्रसंगी ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील, इंटकचे प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश छाजेड, माजी खासदार सत्यजित गायकवाड, ओबीसी प्रदेशाध्यक्ष प्रमोद मोरे, अँड. आकाश छाजेड मार्गदर्शन करणार आहेत.