आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर; प्रजासत्ताकदिनी पदाधिकारी गैरहजर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - काँग्रेसचे शहराध्यक्ष अँड. आकाश छाजेड यांच्याविरोधात मोहीम राबवीत प्रतिकाँग्रेस चालविणार्‍या प्रदेश पदाधिकार्‍यांसह लोकप्रतिनिधींनी प्रजासत्ताकदिनी पक्ष कार्यालयात अनुपस्थित राहत खासगी कार्यक्रमाला हजेरी लावली. या प्रकारामुळे पक्षाची गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली असून, पक्षादेश गुंडाळणार्‍या प्रदेश पदाधिकार्‍यांसह लोकप्रतिनिधींवर पक्षर्शेष्ठी काय कारवाई करणार, असा प्रश्न छाजेड सर्मथकांकडून उपस्थित केला जात आहे.

काही महिन्यांपासून शहर काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी टोकाला गेली आहे. शहराध्यक्ष छाजेड हटाव-काँग्रेस बचाव, असा नारा दिला जात आहे. विरोधी गटाचे नेतृत्व करणार्‍यांमध्ये प्रदेश सरचिटणीस डॉ. शोभा बच्छाव, शरद आहेर, आमदार निर्मला गावित, उत्तमराव कांबळे व पक्षाच्या बहुतांश नगरसेवकांचा समावेश आहे. या गटातटाच्या वादाचे पडसाद पक्ष कार्यालयात प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमावर उमटले. शहराध्यक्ष छाजेडांसह आमदार जयप्रकाश छाजेड, लक्ष्मण जायभावे, माजी महापौर अशोक दिवे, नगरसेवक शाहू खैरे, राहुल दिवे, वत्सला खैरे, समीना मेमन, योगिता आहेर व पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, डॉ. शोभा बच्छाव, शरद आहेर, डॉ. हेमलता पाटील, स्थायी सभापती उद्धव निमसे, माजी खासदार प्रतापराव वाघ यांच्यासह नगरसेवक व आजी-माजी पदाधिकारी अनुपस्थित राहिले. परंतु, हीच मंडळी सिडकोतील र्शीमती सरस्वती गुलाबराव पाटील विद्यालयात ध्वजवंदन कार्यक्रमास उपस्थित होते.