आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभारींनी ‘हाताळली’ गटबाजी; काँग्रेसमधील दोन्ही गट आमनसामने

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शहर काँग्रेसमधील टोकाला गेलेल्या गटबाजीचे दर्शन महाराष्ट्राचे प्रभारी शौराज वाल्मीकी यांना पहिल्याच नाशिक दौर्‍यात घडले. मेळाव्यास दोघा प्रदेश सरचिटणीसांसह आमदार, माजी खासदार, नगरसेवकांनी दांडी तर मारलीच, शिवाय नाराज गटाची भेट घेण्यासाठी शासकीय विर्शामगृहावर आलेल्या प्रभारींवर ऐनवेळी दोन्ही गट आमने-सामने आल्याने नाजूकपणे परिस्थिती हाताळण्याची वेळ आली.

आधी बहिष्काराची तयारी करणार्‍या ‘प्रतिकाँग्रेस’ने दौर्‍याच्या पूर्वसंध्येला कारवाईचा धसका घेत मेळाव्यास उपस्थित राहून प्रभारींचे स्वतंत्रपणे स्वागत करण्याची भूमिका घेतली. प्रत्यक्षात मात्र या पदाधिकार्‍यांनी मेळाव्यास अनुपस्थित राहून गटबाजीवर शिक्कामोर्तब केले. प्रदेश कॉँग्रेस सरचिटणीस डॉ. शोभा बच्छाव, शरद आहेर, प्रदेश चिटणीस डॉ. हेमलता पाटील, आमदार निर्मला गावित, प्रतापराव वाघ, नगरसेवक शिवाजी गांगुर्डे, दिनकर पाटील, शाहू खैरे यांच्यासह बहुतांश नगरसेवकांनी मेळाव्याकडे पाठ फिरवून विर्शामगृहात तळ ठोकला.

दुसरीकडे, लक्षणीय उपस्थिती पाहून व दोन वर्षांतील उपक्रमांचा आढावा ऐकून घेत प्रभारींनी शहराध्यक्ष आकाश छाजेड यांचे कौतुक केले. मेळावा संपेपर्यंत प्रतिकॉँग्रेसचे पदाधिकारी वाल्मीकी यांच्या संपर्कात राहून त्यांना आमंत्रित करीत होते. वाल्मीकी यांनी विर्शामगृहात जाऊन नाराज गटाची भेट घेतली.

पदाधिकार्‍यांना सुनावले : नाराज गटाचे नेतृत्व करणार्‍या आमदार, माजीमंत्री, माजी खासदारांसह उपस्थित पदाधिकार्‍यांचे म्हणणे वाल्मीकी यांनी ऐकून घेतले. सोनिया गांधी यांनी सर्वोच्च असे पंतप्रधानपद नाकारून केलेल्या त्यागाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून केवळ पक्षहित लक्षात घेत गटबाजीला थारा न देता संघटना मजबूत करा, अशा शब्दांत पदाधिकार्‍यांना सुनावतानाच ‘तुमच्या भावना पक्षर्शेष्ठींपर्यंत पोहचवल्या जातील व प्रत्येकाचा सन्मान होईल,’ असे आश्वासनही दिले.

मोदींना केले लक्ष्य, पवारांनाही इशारा
वाल्मीकी यांनी मेळाव्यात अन्न सुरक्षा विधेयक हा क्रांतिकारी निर्णय ठरणार असल्याचे सांगितले. पंतप्रधानपदी राहुल गांधी यांना विराजमान करण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन करीत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर ‘झूठों का सरदार’, ‘मौत का सौदागर’, ‘शैतान’ अशी विशेषणे लावून टीका केली. ते म्हणाले, ‘निवडणुका आल्यावर राममंदिर बांधण्याचे स्वप्न पडू लागते. यातून हिंदू-मुस्लिमांमध्ये मतभेद निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.’ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शिवसेना-मनसे व भाजप या जातीयवादी पक्षांपासून दोन हात दूर न राहिल्यास आघाडीचा फेरविचार करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

छाजेड हटाव, कॉँग्रेस बचाव
वाल्मीकी यांचे आगमन होताच पदाधिकार्‍यांनी ‘छाजेड हटाव-कॉँग्रेस बचाव’च्या घोषणा दिल्या. सुरेश मारू यांनी छाजेड यांनी जातीयवाद सुरू केल्याचा आरोप केला. प्रदेश सरचिटणीस शरद आहेर यांनीही आमदार छाजेड व त्यांचे पुत्र आकाश यांनी महापालिका निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याने सहा नगरसेवकांचा पराभव झाल्याची तक्रार केली. रम्मी राजपूत यांनीही छाजेडांमुळेच विधानसभेत डॉ. बच्छाव यांचा पराभव झाला, असे गार्‍हाणे मांडले. शहराध्यक्ष न बदलल्यास निवडणुकांमध्ये पक्षाला मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.

छाजेड गटही सामने
‘प्रतिकाँग्रेस’च्या पदाधिकार्‍यांची भेट घेतल्यानंतर वाल्मीकी बाहेर पडत असताना समोरच्या बाजूस शहराध्यक्ष छाजेड यांच्यासह त्यांचे सर्मथक जमा झाले होते. उभय बाजूंचे सर्मथक आमने-सामने आल्याने वाद चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन वाल्मीकी यांनीच दोन्ही गटातील पदाधिकार्‍यांना सोबत घेत विर्शामगृहावर भोजनासाठी आणले. या ठिकाणी शरद आहेर यांच्या तोंडात अँड. छाजेड यांना गुलाबजाम भरविण्यास भाग पाडून गटबाजी संपवल्याचे चित्र रंगविण्यात प्रभारींना यश आले.