आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गटबाजीचे ग्रहण सुटेना; कार्यकर्ते व्यक्त करताहेत पदाधिकार्‍यांबद्दल नाराजी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - राष्ट्रपुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीसह राष्ट्रीय सणही स्वतंत्रपणे साजरा करण्याची शहर कॉँग्रेसमधील ताजी परंपरा बुधवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीलाही जारी राहिली. शहर काँग्रेसच्या नियोजित कार्यक्रमाअगोदरच शहराध्यक्ष आकाश छाजेड यांच्याविरोधातील पदाधिकार्‍यांनी रामकुंडावर गांधीज्योत येथे गांधीजींना आदरांजली वाहिली.

गेल्या आठवड्यात प्रजासत्ताकदिनी पक्ष कार्यालयात आयोजित प्रमुख समारंभाकडेदेखील विरोधी गटाचे नेतृत्व करणार्‍या माजी मंत्री तथा प्रदेश सरचिटणीस डॉ. सौ. शोभा बच्छाव यांच्यासह इतरांनी पाठ फिरविली होती. माजी नगरसेवक केशव पाटील यांच्या विद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमास हजेरी लावून त्यांनी एक प्रकारे पक्षर्शेष्ठींनाच आव्हान दिले होते. त्यानंतर शहर कॉँग्रेसने पक्षर्शेष्ठींकडे गटबाजी करणार्‍यांविरुद्ध कारवाईची मागणी केली होती.

शहर कॉँग्रेसतर्फे वर्षानुवर्षे महात्मा गांधी जयंती व पुण्यतिथीनिमित्त गांधीज्योत येथे अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. बुधवारी सकाळी छाजेड यांनी कार्यकर्त्यांना निरोप दिलेला असताना डॉ. बच्छाव, स्थायी समितीचे सभापती उद्धव निमसे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष संपत सकाळे, मविप्र संचालक मुरलीधर पाटील यांच्या उपस्थितीत पुष्पचक्र अर्पण करून आदरांजलीचा स्वतंत्र कार्यक्रम घेतला. शैलेश कुटे, हेमलता पाटील, नगरसेवक शिवाजी गांगुर्डे, नगरसेविका विमल पाटील, वंदना मनचंदा, नितीन सुगंधी, लक्ष्मण मंडाले, पांडुरंग बोडके, दीपक राव, प्रकाश कापडणे, सुरेश मारू आदी यावेळी उपस्थित होते. त्यानंतर शहर कॉँग्रेसतर्फे आयोजित कार्यक्रमास महिला अध्यक्ष वत्सलाताई खैरे, नगरसेविका योगिता आहेर, समिना मेमन, राहुल दिवे, शिवाजी पवार, राजेंद्र महाले आदी उपस्थित होते.

निवडणुकांनंतर पेटला संघर्ष

महापालिका शिक्षण मंडळ, स्वीकृत नगरसेवक निवडणुकीनंतर आमदार जयप्रकाश छाजेड यांचे सर्मथक आणि त्यांच्या विरोधी गटात संघर्ष सुरू झाला. त्याचा प्रारंभ तुपसारखे लॉन्सवर आमदार निर्मला गावित, आमदार माणिकराव कोकाटे, डॉ. सौ. बच्छाव, शरद आहेर, शैलेश कुटे, उत्तमराव कांबळे यांच्या उपस्थितीत शिक्षण मंडळ सदस्य सत्कार कार्यक्रमापासून झाला. या कार्यक्रमात छाजेड पिता-पुत्रांवर उघडपणे टीका करीत त्यांना हटवण्यासाठी मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर महात्मा गांधी जयंती, लोकमान्य टिळक पुण्यतिथी, इंदिरा गांधी जयंतीचे कार्यक्रम स्वतंत्रपणे झाले. तसेच, गणेशोत्सवात छाजेड यांच्याविरोधात व्यंगचित्रात्मक होर्डिंग लावण्यात आल्याने संघर्ष जास्तच पेटला. ‘छाजेड हटाव’ला यश येईपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचे विरोधी गट सांगत असताना, दुसरीकडे छाजेड गटाकडूनही वेगवेगळ्या कार्यक्रमांना पक्षर्शेष्ठींना निमंत्रित करून कुरघोडी केली जात आहे.